सहा वाहनांना कंटेनरची धडक, तिघांचा मृत्यू; मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; सर्व वाहनांचा चक्काचूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:48 IST2026-03-19T12:47:48+5:302026-03-19T12:48:12+5:30
खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी सकाळी भरधाव कंटेनरने पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तिघांचा ...

सहा वाहनांना कंटेनरची धडक, तिघांचा मृत्यू; मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; सर्व वाहनांचा चक्काचूर
खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी सकाळी भरधाव कंटेनरने पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या कारमधील चार प्रवाशांसह कंटेनरचालकही जखमी झाला. सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात सहाही वाहनांचा चक्काचूर झाला.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून कंटेनर चालक अवधेश यादव (३७, उत्तर प्रदेश) हा कंटेनर घेऊन मुंबईकडे जात असताना खोपोली एक्झिटला धडक देऊन पुढे कारला धडक दिली. त्यानंतर कंटेनरने पुढे बल्करला मागून जोरदार धडक दिली. अपघातात कारमधील श्रीकांत जाधव ( ६३, पुणे), अंबादास पेटारे (पुणे), प्रमोद पवार या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या कारमधील स्वप्नील भुजबळ, नवनाथ भुजबळ, अक्षय गायकवाड, भानुदास गायकवाड आणि कंटेनर चालक अवधेश यादव हे जखमी झाले.
खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू
अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलिस, खोपोली पोलिस, आयआरबी पेट्रोलिंग, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, मृत्युंजय टीम आदींनी घटनास्थळी दाखल होत कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना तत्काळ बाहेर काढून खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. तिघांचे मृतदेह खालापूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.