नुसता गोंधळ!! मुंबई-गोवा महामार्गावर दिशादर्शक फलक नाहीत; वाहनचालक दुसऱ्याच गावी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:52 IST2025-01-10T11:52:25+5:302025-01-10T11:52:52+5:30
वाहनचालकांचा चुकतो अंदाज

नुसता गोंधळ!! मुंबई-गोवा महामार्गावर दिशादर्शक फलक नाहीत; वाहनचालक दुसऱ्याच गावी!
लोकमत न्यूज नेटवर्क, वडखळ: मुंबई-गोवामहामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या भागातील काही ठिकाणच्या मोऱ्या, पूल, अंतर्गत रस्ते, प्रकाशयोजना या कामांना गती दिली आहे. मात्र या भागात दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांची दिशाभूल होत आहे. यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
पळस्पे ते इंदापूरदरम्यान साईट पट्ट्यांवर पिवळे-पांढरे पट्टे लावणे, गतिरोधकांवर रेडियम रिफ्लेक्टर आणि मुख्य ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे बंधनकारक आहे. मात्र दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांना गावांसह महत्त्वाच्या ठिकाणांचा अंदाज येत नाही. यामुळे या मार्गावर अपघात घडत आहेत.
हजारो वाहनांचा राबता
- पेण हे गणेशमूर्तींचे माहेरघर असून येथे हजारो वाहने येतात. मात्र मुंबई-गोवामहामार्गाच्या पेण प्रवेशद्वारावर दिशादर्शक फलक नसल्याने हजारो वाहने पेण सोडून पुढे जातात.
- यामुळे मुंबई- गोवा महामार्गावर शादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी केली आहे.
मुंबई- गोवा महामार्गावरील काही ठिकाण कामे जलदगतीने सुरू असून, प्रकाशाची सोय केली आहे. पळस्पे ते इंदापूरदरम्यानच्या मुख्य ठिकाणी दिशादर्शक फलकसुद्धा लवकरच उभारण्यात येतील. याबाबत संबंधित ठेकेदारांना पत्र पुन्हा देण्यात येणार आहे.
- यशवंत घोटकर, अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग