जुने विरुद्ध नवीन, भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 01:48 IST2019-08-01T01:48:45+5:302019-08-01T01:48:48+5:30
गेल्या कित्येक दिवसांपासून भाजपचे जुने आणि निष्ठावंत असलेले कार्यकर्ते

जुने विरुद्ध नवीन, भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर
अलिबाग : तालुक्यातील नवीन विरुद्ध जुन्या पदाधिकाऱ्यांमधील वाद शिगेला गेला आहे. भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांना संघटनेतील महत्त्वाच्या पदावरून दूर केल्याने नाराज आसलेल्या एका गटाने भाजपच्या जिल्हा कार्यालयाबोहर बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार केला आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून भाजपचे जुने आणि निष्ठावंत असलेले कार्यकर्ते विकास काठे, संकेत जोशी, राजेश पाटील, देवेन सोनावणे, इफ्तिकार अत्तार यांना सतत डावलण्यात येत असल्याचा अरोप एका प्रसिद्धीपत्रकातून केला आहे. तसेच पक्षात अन्याय होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. काहीच दिवसांपूर्वी मुरुड तालुकाध्यक्ष जयवंत अंबाजी यांनाही पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आल्याने कार्यकर्ते आणि अंबाजी यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुजाभावाची वागणूक मिळत आहे, निर्णय प्रक्रियेत डावलण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे राजेश पाटील यांनी अॅड. मोहिते यांचे नाव न घेता केला. निवेदनामध्ये विकास काठे, संकेत जोशी, देवेन सोनावणे, इफ्तिखार अत्तार यांची नावे आहेत. याबाबत अॅड. महेश मोहिते यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.