‘बाळा मी आलेच’, म्हणत माऊलीने मागे पाहताच चार वर्षीय चिमुरडी क्षणात गायब, नाल्याजवळ सापडली चप्पल अन् कपडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:36 IST2025-11-14T12:34:41+5:302025-11-14T12:36:41+5:30
Pen News: पेण तालुक्यातील हेटवणे वाडीतील चार वर्षांची चिमुकली बुधवारी, १२ नोव्हेंबरला सकाळी आईसोबत गावाबाहेरच्या शौचालयात गेली असता काही मिनिटांतच अचानकपणे बेपत्ता झाली.

‘बाळा मी आलेच’, म्हणत माऊलीने मागे पाहताच चार वर्षीय चिमुरडी क्षणात गायब, नाल्याजवळ सापडली चप्पल अन् कपडे
- दत्ता म्हात्रे
पेण - पेण तालुक्यातील हेटवणे वाडीतील चार वर्षांची चिमुकली बुधवारी, १२ नोव्हेंबरला सकाळी आईसोबत गावाबाहेरच्या शौचालयात गेली असता काही मिनिटांतच अचानकपणे बेपत्ता झाली. ‘बाळा आलेच मी’, असे म्हणून आईने मागे पाहिले असता काही क्षणातच मुलगी गायब झाली. आईच्या आरडाओरडीनंतर ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली, मात्र मुलीचा काहीच पत्ता लागला नाही.
गावाला लागून असलेल्या घनदाट जंगलात रात्रीपर्यंत शोधकार्य सुरू ठेवण्यात आले. दरम्यान, शाेधमाेहीम सुरू असताना ग्रामस्थांना मुलीची चप्पल आणि कपडे नाल्याजवळ सापडले, मात्र मुलगी मात्र कुठेच सापडली नाही. या घटनेने गावात संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, पाेलिसांचाही तपास सुरू आहे.
घातपात की अन्य काही?
शोधमोहीम युद्ध पातळीवर सुरू असून ड्रोन कॅमेरा, पोलिस श्वान पथक, ग्रामस्थ असे २०० जण या शोधमोहिमेत सहभागी झाले असून, आतापर्यंत हाती काहीच लागले नसल्याने कुटुंबीयांची अवस्था बिकट झाली आहे. पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनेची गंभीर दखल घेत पेण पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपी, क्यूआरटी, श्वानपथक आणि खोपोली बचाव पथकाला घटनास्थळी पाठविले. शोधमोहीम सुरू असली, तरी २४ तास उलटूनही चिमुकलीचा थांगपत्ता लागलेला नाही. परिसरात संभ्रम आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, घातपात की अन्य काही? या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.