अलिबाग एसटी बस स्थानकाच्या कामाला अद्याप मुहुर्त नाही; नारळ फोडून ४ वर्ष झाली

By निखिल म्हात्रे | Published: December 18, 2023 01:16 PM2023-12-18T13:16:02+5:302023-12-18T13:16:10+5:30

अलिबाग एसटी बस स्थानकाचे नुतनीकरण अडकले लालफितीत,  सुधारित अंदाजपत्रक बनविण्याची प्रक्रिया सुरू

Alibaug ST Bus Station is not scheduled yet; It has been 4 years since the coconut was broken | अलिबाग एसटी बस स्थानकाच्या कामाला अद्याप मुहुर्त नाही; नारळ फोडून ४ वर्ष झाली

अलिबाग एसटी बस स्थानकाच्या कामाला अद्याप मुहुर्त नाही; नारळ फोडून ४ वर्ष झाली

अलिबाग - जिल्ह्याचे ठिकाण असलेले अलिबागच्या एसटी बस स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाचा नारळ फोडून तब्बल चार उलटली तरी स्थानकाच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही. गेली चार वर्षापासून स्थानकाचे नुतनीकरण लालफितीत अडकले आहे. आॅगस्ट 219 मध्ये नुतनीकरण कामाचे भूमीपूजन झालेल्या या स्थानकाचे काम पुढील दीड वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र प्रकल्प लालफितीत अडकला आहे. अलिबाग आगारातून दररोज सुमारे 19 हजार प्रवासी प्रवास करीत असून नियमित प्रवाशांसह पर्यटक प्रवाशांचा वाढता ताण स्थानकावर वाढत आहे.

अलिबाग हे रायगड जिल्हयाचे ठिकाण आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 1 एप्रिल 1961 रोजी प्रवाशांच्या सोयीसाठी अलिबाग स्थानक उभारण्यात आले. या स्थानकातून नेहमी हजारोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांसह पर्यटक व कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाकडून चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी जून्या स्थानकाचे नुतनीकरण करण्याचा निर्णय 2019 मध्ये घेतला होता. मे 2019 मध्ये अलिबाग स्थानकातील माती परीक्षण पुणे येथील डिरोक्ट्रीक इंजिनिअरिंग या कंपनीकडून करून नुतन इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला होता. नवीन आराखड्याप्रमाणे तळ मजला व पहिला मजला अशा पध्दतीने बस स्थानकामध्ये इमारत आहे. स्थानकातील तळ मजल्यामध्ये 14 फलाट आहेत. प्रवाशांसाठी खास प्रतिक्षालय, उपहारगृह, प्रसाधनगृह, पार्सल खोली, महिलांसाठी हिरकणी कक्ष, आरक्षण कक्ष, स्थानक कार्यालय असणार आहे. तसेच, पहिल्या मजल्यावर चालक व वाहकांसाठी विश्रांती कक्ष बांधण्यात येणार आहे. त्यामध्ये महिला व पुरुषांसाठी वेगळे कक्ष असणार आहे. सुमारे एक लाख प्रवासी ये-जा करण्याची क्षमता नव्या स्थानकात असणार आहे.

7 हजार 630 चैारस फुट इतक्या क्षेत्रावर नवीन स्थानकाचे बांधकाम करण्यात येणार आहे. बाहेर जाण्याचा व आतमध्ये येण्याचा एसटी बसचा मार्ग वेगळा असून प्रवाशांसाठीही वेगळा मार्ग आहे. या आराखड्यानुसार तयार करण्यात येणाऱ्या स्थानकाच्या कामाचा भूमीपूजन शुभारंभ झाला होता. एसटी महामंडळाच्या विभागानुसार 18 महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2021 पर्यंत काम होणे अपेक्षीत होते. मात्र चार वर्षे होऊनही या स्थानकाच्या कामाला सुरुवात झाली नाही. अलिबाग स्थानकाच्या कामाची निविदा 19 सप्टेंबर रोजी मागविण्यात आली होती. त्यानंतर या निविदा मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविण्यात आल्या. मात्र लालफितीत अडकलेल्या या कामामुळे एसटी प्रवाशांची गैरसोय होत आहे.

नूतनीकरणाच्या कामाला गती
सध्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेकापचे नेते आ. जयंत पाटील यांनी आवाज उठविला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालु राज्य दर सुचीनुसार सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी काळात तरी अलिबाग एसटी बस स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आॅगस्ट 2019 पर्यंत नुतनीकरणाच्या कामासाठी 6 कोटी 28 लाखांचा खर्च होणार होता. आता या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

अलिबाग एसटी बस स्थानकाच्या नुतनीकरणाच्या कामाची कार्यवाही वरिष्ठ कार्यालयाकडून सुरू आहे. स्थानकाच्या नुतनीकरणाचे काम का रखडले आहे याबाबत आपल्याला माहिती नाही. - दीपक घोडे, विभाग नियंत्रक, रायगड विभाग, राज्य परिवहन महामंडळ

Web Title: Alibaug ST Bus Station is not scheduled yet; It has been 4 years since the coconut was broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.