‘तळीये’तील १३५ घरे अपूर्ण, तीन वर्षांनंतरही ग्रामस्थांना निवाऱ्याची प्रतीक्षा; आतापर्यंत ९२ घरांचे काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 07:55 IST2025-07-04T07:54:33+5:302025-07-04T07:55:13+5:30
२२ जुलै २०२१ रोजी महाड तालुक्यातील तळीये आणि पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी गावांवर दरड कोसळली होती. तळीये दुर्घटनेत ८४ जणांना जीव गमवावा लागला होता.

‘तळीये’तील १३५ घरे अपूर्ण, तीन वर्षांनंतरही ग्रामस्थांना निवाऱ्याची प्रतीक्षा; आतापर्यंत ९२ घरांचे काम पूर्ण
अलिबाग : महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये गावाचे पुनर्वसन तीन वर्षांपासून रखडले आहे. सध्या येथे ९२ घरे पूर्ण झाली असून, ६६ जणांना हक्काची घरे मिळाली असली तरी १३५ घरांची कामे अपूर्ण आहेत.
२२ जुलै २०२१ रोजी महाड तालुक्यातील तळीये आणि पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी गावांवर दरड कोसळली होती. तळीये दुर्घटनेत ८४ जणांना जीव गमवावा लागला होता. तर केवनाळे, सुतारवाडीत ११ जण गाडले होते. या दुर्घटनेनंतर शासनाने तळीयेसह पाच वाड्यांचे म्हाडामार्फत पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी २७१ घरांची पायाभरणी करण्यास सुरुवात झाली. तीन वर्षांत फक्त ९२ घरांची उभारणी झाली.
‘म्हाडा’तर्फे २६३ सदनिकांच्या बांधकामास निविदेद्वारे मंजुरी दिली. त्यानंतर कामे सुरू झाली. २७१ पैकी २२७ घरे सध्या बांधली जाणार आहेत. २२७ सदनिकांच्या भूखंडापैकी २७ सदनिकांच्या जागेवर कंटेनर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या २०० सदनिकांचे काम सुरू आहे. २०० पैकी सद्य:स्थितीत पहिल्या टप्प्यात ६६ तर दुसऱ्या टप्प्यातील २६, असे एकूण ९२ सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यातील ६६ जणांना घराच्या चाव्या देण्यात आलेल्या आहेत.
इर्शाळवाडीचेच पुनर्वसन पूर्ण
खालापूरमधील इर्शाळवाडी या आदिवासी वाडीवर १९ जुलै २०२३च्या रात्री दरड कोसळली. यात २७ जणांचा मृत्यू झाला. तर शोध न लागल्याने ८४ जणांचा शासनाने मृत घोषित केले. त्यानंतर ४४ कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
चौकमधील मानिवली येथे अडीच हेक्टर जागेत ४४ घरे बांधली. आपदग्रस्त कुटुंबांना ३ गुंठे जागेवर सिडकोच्या माध्यमातून ही घरे बांधून दिली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १२ दरड घटना घडल्या. यापैकी इर्शाळवाडी ग्रामस्थांचे पुनर्वसन पूर्ण करण्यात यश आले. तर, तळीये, केवनाळे, साखर सुतारवाडी, जुई, दासगाव आणि इतर ठिकाणचे पुनर्वसन अद्याप रखडलेले आहे.
भौगोलिक सर्वेक्षण रखडले
तळीये गावातील एका वाडीने पुनर्वसन करू नका, असा ठराव दिलेला आहे. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी भौगोलिक सर्वेक्षण करून निर्णय घेऊ, असे म्हटले होते. मात्र, अजूनही भौगोलिक सर्वेक्षण झालेले नाही.
तळीये ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २२७ पैकी ९२ सदनिका पूर्ण होऊन ६६ घरांचे वाटप झाले आहे. १३५ सदनिकांचे काम सुरू आहे. ४४ सदनिका या एका गावाने पुनर्वसन करण्यास नकार दिल्याने थांबले आहे. भौगोलिक सर्वेक्षणानंतर निर्णय घेतला जाणार आहे.
महेश शितोळे, तहसीलदार, महाड