ZP Election 2026: हिंजवडी गटात दुपारी १२ पर्यंत मतदारांचा अल्प प्रतिसाद; मतदानाची टक्केवारी वाढवणे सर्वच उमेदवारांपुढे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 14:52 IST2026-02-07T14:52:02+5:302026-02-07T14:52:22+5:30
ZP Election 2026 सकाळची कामे तसेच, दैनंदिन दिनक्रमामुळे अनेक मतदारांनी दुपार नंतर मतदान करण्यास प्राधान्य दिल्याची परिस्थिती आहे

ZP Election 2026: हिंजवडी गटात दुपारी १२ पर्यंत मतदारांचा अल्प प्रतिसाद; मतदानाची टक्केवारी वाढवणे सर्वच उमेदवारांपुढे आव्हान
हिंजवडी : मुळशी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समिती गणांच्या मतदान प्रक्रियेला आज शनिवार (दि.७) रोजी सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली. मात्र, दुपारी बारा वाजेपर्यंत दोन्ही सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद दिसून आला. त्यामुळे, हिंजवडीजिल्हा परिषद गटात समावेश होत असलेल्या माण, हिंजवडी गणात मतदानाची आकडेवारी वाढवणे सर्वच उमेदवारांपुढे आव्हान असणार आहे.
दरम्यान, माण गणात सकाळी ११. ३० पर्यंत, १८. ९६% मतदान तर, हिंजवडी गणात १४. ६३% मतदान झाले. तर, हिंजवडी जिल्हा परिषद गटात एकूण झालेले मतदान टक्केवारी १८. ४९% आहे. दरम्यान, मतदान केंद्रांवर सुरुवातीच्या दोन तासात तुरळक मतदारांची उपस्थिती होती. तर, काही मतदान केंद्रांवर शांत वातावरण पाहायला मिळाले. प्रामुख्याने हिंजवडी गणात हिंजवडी, मारुंजी, जांबे, नेरे दत्तवाडी, कासारसाई अशी गावे येत असून, प्रत्येक ठिकाणी एक पेक्षा जास्त सुसज्ज मतदान कक्ष तयार करण्यात आले आहे. माण गणात सुद्धा माण, भोईर वाडी आयटी परिसरासह जवळच असलेल्या नांदे, चांदे, मुलखेड आणि ग्रामीण भागातील घोटावडे, संपूर्ण रिहे खोरे, खांबोली, पिंपळोली, कातरखडक आणि आंधळे गाव परिसरात सुद्धा सुसज्ज मतदान कक्ष तयार करण्यात आले. मात्र, सकाळची कामे तसेच, दैनंदिन दिनक्रमामुळे अनेक मतदारांनी दुपार नंतर मतदान करण्यास प्राधान्य दिल्याची परिस्थिती आहे. तत्पुर्वी, मतदानाच्या पार्श्वभूमीवर आयटीपरिसरासह ग्रामीण भागात निवडणूक प्रशासनाकडून मतदानासाठी सर्व आवश्यक सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, हिंजवडी जिल्हा परिषद गटात समावेश होत असलेल्या पौड आणि हिंजवडी पोलीस स्टेशन कडून सुद्धा दोन्ही गणातील सर्व मतदान कक्ष परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे.