ZP Election 2026: बदललेल्या युती, अपक्षांची गर्दी अन् काही ठिकाणी तणाव; निकालाकडे सर्वांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 12:09 IST2026-02-08T12:09:21+5:302026-02-08T12:09:48+5:30
- शोकछायेत जिल्हा परिषद–पंचायत समिती मतदान; अपवाद वगळता शांततेत प्रक्रिया

ZP Election 2026: बदललेल्या युती, अपक्षांची गर्दी अन् काही ठिकाणी तणाव; निकालाकडे सर्वांचे लक्ष
पुणे : जिल्हा परिषदेचे ७३ गट व पंचायत समितीचे १४६ गण यांच्यासाठी शनिवारी अपवाद वगळता शांततेत ६८.८९ टक्के मतदान झाले. बदललेल्या राजकीय युती, अपक्ष उमेदवारांची वाढलेली संख्या आणि त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण जिल्हा शोकसागरात असतानाच ही निवडणूक पार पडली. या सर्व घटकांचा परिणाम मतदानावर झाल्याचे चित्र दिसून आले.
जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी २९९ उमेदवार, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी एकूण ८२७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. अशा एकूण २१९ जागांसाठी उमेदवारांचे भवितव्य आता मतदान यंत्रात बंद झाले असून, गुलाल कोणाच्या अंगावर उधळणार हे सोमवारी होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. दरम्यान, काही ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडणे, शिरूर व हवेली तालुक्यात शाब्दिक चकमकी व झटापटीच्या घटना घडल्याचेही समोर आले.
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतील फाटाफुटीनंतर अनेक इच्छुकांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सक्षम उमेदवारांची कमतरता व स्थानिक राजकीय गणितांमुळे अनेक ठिकाणी युतीचा मार्ग स्वीकारण्यात आला. काही भागांत दोन्ही राष्ट्रवादी, भाजप व शिंदे गट एकत्र आल्याचे चित्र दिसले. ज्यांना कोणत्याही आघाडीत स्थान मिळाले नाही, त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. जिल्हा परिषद गटांपैकी तब्बल ६१ उमेदवार अपक्ष आहेत. बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात थेट लढत असली, तरी बंडखोरी व नाराजीमुळे निकालांमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रांजणगाव गणपती गटात बोगस मतदानाचा प्रयत्न
शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती गटात भाजपच्या स्वाती पाचुंदकर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती पाचुंदकर यांच्यात चुरशीची लढत झाली. देवाचीवाडी येथील मतदान केंद्रावर चार जणांनी बोगस मतदानाचा प्रयत्न केला. मात्र स्थानिकांनी सतर्कता दाखवत त्यांना रोखले व चौघांना पोलिसांच्या स्वाधीन केले.
आंबेगावमध्ये चार ठिकाणी मतदान यंत्रे बंद
आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडसह अन्य तीन ठिकाणी मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळातच यंत्रांमध्ये बिघाड झाला. केंद्र अधिकाऱ्यांनी तत्काळ दुसरी यंत्रे उपलब्ध करून दिल्याने मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत झाली.
पिंपरखेड येथे माजी आमदारांची शाब्दिक चकमक
टाकळी हाजी गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे दामू घोडे व भाजपचे राजेंद्र गावडे यांच्यात अटीतटीची लढत आहे. पिंपरखेड येथे मतदारांना भेटण्यावरून दामू घोडे व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळला.
हवेली तालुक्यात तिघांवर गुन्हा दाखल
हवेली तालुक्यातील प्रयागधाम मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा प्रयत्न केल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोरतापवाडी गणात उमेदवारांमध्ये झटापट
हवेली तालुक्यातील सोरतापवाडी गणात भाजपचे सुदर्शन चौधरी व रयत शेतकरी संघटनेचे धनंजय चौधरी यांच्यात शाब्दिक वाद होऊन तो झटापटीत बदलला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. एकूणच काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, आता सर्वांचे लक्ष सोमवारी होणाऱ्या निकालाकडे लागले आहे.