Zilla Parishad Election : जिल्हा परिषद, पंचायत समिती कारभाऱ्यांसाठी उद्या मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 09:46 IST2026-02-06T09:45:56+5:302026-02-06T09:46:04+5:30

 जिल्ह्यातील कारभाऱ्यांसाठी उद्या मतदान, प्रशासनाची जय्यत तयारी, ३६०५ मतदान केंद्रांवर सुमारे ३० लाख मतदार करणार मतदान

Zilla Parishad Election Voting for Zilla Parishad, Panchayat Samiti office bearers tomorrow | Zilla Parishad Election : जिल्हा परिषद, पंचायत समिती कारभाऱ्यांसाठी उद्या मतदान

Zilla Parishad Election : जिल्हा परिषद, पंचायत समिती कारभाऱ्यांसाठी उद्या मतदान

पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी (दि. ७) मतदान होत आहे. जिल्ह्यात ३ हजार ६०५ मतदान केंद्र असून, या अंतर्गत पुरुष मतदार १५ लाख २२ हजार २५६, स्त्री मतदार १४ लाख ५० हजार १४ आणि इतर ९१ असे एकूण २९ लाख ७२ हजार ३५९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
 
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू झाली. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २१ जानेवारी होती. आता एकूण २९९ उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यात १६४ पुरुष तर १३५ महिला उमेदवारांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेसाठी इंदापूर तालुक्यातून सर्वाधिक ४१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात तब्बल ३१ महिला उमेदवारांचा समावेश असून, १० पुरुष उमेदवार रिंगणात उरले आहेत. सर्वात कमी उमेदवार वेल्हे तालुक्यात ८ असून, येथे एकही महिला उमेदवार रिंगणात नाही.
 
पंचायत समितीसाठी ५२८ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. त्यामध्ये २७४ पुरुष तर २५४ महिला उमेदवारांचा समावेश आहे. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत पंचायत समितीसाठी ७२९ उमेदवारांनी माघार घेतली. जिल्हा परिषदेच्या गटांप्रमाणेच पंचायत समितीच्या गणांमध्ये देखील इंदापूर तालुक्यात सर्वाधिक ७२ उमेदवार निवडणूक लढत आहेत. त्यात ३८ पुरुष तर ३४ महिला उमेदवारांचा समावेश आहे. सर्वात कमी २० उमेदवार वेल्हे तालुक्यात असून, त्यात ११ पुरुष तर ९ महिला उमेदवार रिंगणात आहेत.
 
जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांसाठी उमेदवारांची निश्चिती झाल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने मतदान यंत्र आणि कंट्रोल युनिटची संख्या अंतिम केली आहे. त्यानुसार आता ३ हजार ६९३ मतदान यंत्रे तर ३६०५ कंट्रोल युनिट मतदान केंद्रावर वापरण्यात येणार आहेत. तर १४३ पैकी केवळ तीन गणांमध्ये दोन मतदान यंत्रांची गरज भासणार आहे. मतदान यंत्र आणि कंट्रोल युनिट बंद पडल्यास एकूण १४ हजार ३३८ मतदान यंत्रांची उपलब्धता करून दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ही उपलब्धता आता दुपटीऐवजी चारपट केली आहे.

 
उमेदवारांची संख्या वाढल्याने बारामती, मुळशी आणि इंदापूर तालुक्यातील प्रत्येकी एका गणात दोन मतदान यंत्रांची गरज भासणार आहे. त्यात मुळशी तालुक्यातील हिंजवडी गटातील माण गण, बारामती तालुक्यातील पणदरे गटातील पणदरे गण इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गटातील सणसर गणाचा समावेश आहे. त्यानुसार मुळशी तालुक्यात २२७ मतदान केंद्रांवर २६२ मतदान यंत्रे बसविली जाणार आहेत. बारामती तालुक्यातील २९९ मतदान केंद्रांवर ३२४ मतदान यंत्रे, तर इंदापूर तालुक्यातील ४०० मतदान केंद्रांवर ४२८ मतदान यंत्रे बसविली जाणार आहेत. अन्य तालुक्यांत मतदान केंद्रांच्या संख्येइतकीच मतदान यंत्रे आणि कंट्रोल युनिट वापरण्यात येणार आहेत.
 
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३ हजार ६०५ मतदान केंद्रांवर १४ हजार ३३८ मतदान यंत्र व ५ हजार ८३३ कंट्रोल युनिट उपलब्ध असतील. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वाधिक ४०० मतदान केंद्र इंदापूर तालुक्यात असून, यासाठी ४२८ मतदान यंत्र व ४०० कंट्रोल युनिट वापरण्यात येतील. तर सर्वांत कमी १०५ मतदान केंद्र वेल्हा तालुक्यात असून तेथे प्रत्येकी १०५ मतदान यंत्र व कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
 
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात १३ तालुक्यांत एकूण २३ हजार ११४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारामती तालुक्यात १ हजार ९४५, मावळ १ हजार ६१२, मुळशी १ हजार ४९५, शिरूर २ हजार १९०, हवेली १ हजार ८००, दौंड २ हजार ६०, इंदापूर २ हजार ६३२, पुरंदर १ हजार ५३८, भोर १ हजार १९०, वेल्हे ४५०, आंबेगाव १ हजार ५७५, जुन्नर २ हजार ४११ आणि खेड २ हजार २१६ तालुक्यात असे एकूण २३ हजार ११४ मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यात १३ ठिकाणी स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्या असून, तेथे चोवीस तास सुरक्षा ठेवण्यात येणार आहे.
 

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत ६७ हजार दुबार मतदार असल्याचे स्पष्ट झाले असून, या मतदारांची आता पडताळणी करण्यात येत आहे. अशा मतदारांकडून एकाच ठिकाणी मतदान करणार असे हमीपत्र लिहून घेण्यात येत आहे. तर मतदानादिवशी मतदार यादीत या मतदारांचा मतदारांच्या हमीपत्राचा उल्लेख करून त्यांना मतदानास परवानगी देण्यात येणार आहे. ज्या मतदारांची पडताळणी होऊ शकणार नाही अशांच्या नावासमोर स्टार मार्क कायम असणार आहे. मतदानावेळी त्यांना पुन्हा हमीपत्र द्यावे लागणार आहे.
 

महापालिका निवडणुकीत मतदारांच्या बोटाला मतदान झाल्याची खूण लावण्यासाठी वापरण्यात आलेल्या मार्कर पेनवरून मोठा गोंधळ उडाला होता. अनेक ठिकाणी मार्करची शाई पुसली जाणे, ती अस्पष्ट दिसणे, याबाबत मतदारांनी आक्षेप घेतले होते. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पुन्हा एकदा पारंपरिक इंडेलिबल इंक (शाई) वापरण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यासाठी म्हैसूर येथून १० हजार ८०० शाईच्या बॉटल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


सुमारे ३० लाख मतदार
जिल्ह्यात या निवडणुकीसाठी २९ लाख ७६ हजार ४५४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात १५ लाख २६ हजार ९८६ पुरुष, १४ लाख ४९ हजार ३७३ महिला तर ९५ इतर मतदार असतील. बारामती तालुक्यात २ लाख ६४ हजार ६४२, मावळ २ लाख ३१६, मुळशी १ लाख ७३ हजार ४०१, शिरुर ३ लाख १ हजार ७८६, हवेली २ लाख ५१ हजार ५३३, दौंड २ लाख ७३ हजार १००, इंदापूर ३ लाख २१ हजार २, पुरंदर १ लाख ८९ हजार ४०३, भोर १ लाख ५४ हजार ८१०, वेल्हे ५५ हजार २३०, आंबेगाव १ लाख ८४ हजार ५२, जुन्नर ३ लाख ७ हजार २६० आणि खेड तालुक्यात २ लाख ९५ हजार ८२४ असे एकूण २९ लाख ७२ हजार ३५९ मतदार आहेत.

३ हजार ६०५ मतदान केंद्र
बारामती तालुक्यात २९९, मावळ २४३, मुळशी २२७, शिरुर ३३७, हवेली २६३, दौंड ३१७, इंदापूर ४००, पुरंदर २३५, भोर २३७, वेल्हे १०५, आंबेगाव २३९, जुन्नर ३६६ आणि खेड ३३७ तालुक्यात अशा एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्र आहेत. यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १३ आदर्श व महिला मतदान केंद्र आहेत. मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी आदर्श मतदान केंद्रांवर विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, आकर्षक सजावट तसेच मतदानाविषयी जनजागृती करणारे फलक यांचा समावेश असणार आहे. महिला मतदान केंद्रांमध्ये संपूर्ण व्यवस्थापन महिला अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून केले जाणार आहे. हवेली, भोर आणि इंदापूर या तीन तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे तीन परदानशीन मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, पडदा व्यवस्था, महिला सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेतली जाणार आहे. 

 

Web Title : पुणे जिला परिषद चुनाव: परिषद, समिति सदस्यों के लिए कल मतदान

Web Summary : पुणे जिले में जिला परिषद और पंचायत समिति के लिए शनिवार को मतदान। 29 लाख से अधिक मतदाता मताधिकार का प्रयोग करेंगे। जिला परिषद के लिए 299 और पंचायत समिति के लिए 528 उम्मीदवार मैदान में हैं। स्ट्रांग रूम सुरक्षित हैं।

Web Title : Pune Zilla Parishad Elections: Voting tomorrow for council, committee members.

Web Summary : Pune district votes Saturday for Zilla Parishad & Panchayat Samiti. Over 29 lakh voters will exercise their right. 299 candidates for Zilla Parishad and 528 for Panchayat Samiti are in the race. Strong rooms are secured.