Zilla Parishad Election: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:11 IST2026-02-03T16:10:09+5:302026-02-03T16:11:43+5:30
Zilla Parishad Election निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावरील निर्बंध: कोणतीही व्यक्ती, संस्था, पक्ष, कार्यकर्ते यांनी ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी
पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश जिल्ह्यात ९ फेब्रुवारीपर्यंत अंमलात राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी, मुद्रणालयाचे मालक व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापताना निर्बंध घालण्यात येत आहेत. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय व विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे रस्त्यावर कोणताही राजकीय पक्ष, व्यक्ती, संघटना, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी धरणे आंदोलन, मोर्चा, निर्देशने, उपोषण करणे या बाबी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
निवडणूक प्रचाराचे साहित्य, सार्वजनिक इमारतीचे ठिकाण, सार्वजनिक रस्त्यावर निवडणूकी संबंधी पोर्स्टस, बॅनर्स, पॉम्प्लेटस, कटआऊटस, होर्डिंग्ज, कमानी आदी रहदारीस अडथळा निर्माण होईल व अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यावर निर्बंध घालण्यात येत आहे. कोणत्याही राजकीय पक्षानी, निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी, किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक प्रचारासाठी १० पेक्षा अधिक मोटार गाड्या, वाहनांचा ताफ्याचा वापर करण्यावर निर्बंध घालण्यात येत आहे. निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावरील निर्बंध: कोणतीही व्यक्ती, संस्था, पक्ष, कार्यकर्ते यांनी ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही. सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपणाचा वापर करता येणार नाही तसेच प्रचाराकरीता ध्वनी क्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, फिरणाऱ्या वाहनास रस्त्यावरुन धावत असतांना ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार व इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापरासंबंधीच्या परवानगीबाबत माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.
वाहनावर लावायचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार, प्रतिनिधी, निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधी, हितचिंतकांनी निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे इत्यादीकरीता कोणत्याही व्यक्तींच्या खाजगी जागा, इमारत, आवार, भिंती आदीवर संबंधित मालक व सार्वजनिक प्राधिकरणाची परवानगीशिवाय वापर करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.