Pune ZP Election 2026: पुणे जिल्ह्यात २९ लाखाहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 17:35 IST2026-02-06T17:35:02+5:302026-02-06T17:35:29+5:30
Pune Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेच्या ७३ गट व पंचायत समितीच्या १४६ गणाकरिता शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान करता येणार आहे

Pune ZP Election 2026: पुणे जिल्ह्यात २९ लाखाहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर फेब्रुवारी ९ रोजी मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार आहे. मतदारांनी निवडणुकीकरिता उर्त्स्फूतपणे मतदान करावे, नागरिक व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसहिंतेचे पालन करून शांततेत पूर्ण प्रक्रिया पार पाडावी, संपूर्ण निवडणुकीच्या कामकाजाकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
जिल्हा परिषदेच्या ७३ गट व पंचायत समितीच्या १४६ गणाकरिता शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० असून मतदानापुर्वी मॉक पोल घेतला जाणार आहे. मतदानाच्या दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारी रोजी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा समाज माध्यमांमध्ये कुठल्याच प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पुणे जिल्ह्यात २९ लाखाहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क
जिल्ह्यात ३ हजार ६०५ मतदान केंद्र असून याअंतर्गत पुरुष १५ लाख २७ हजार १५१, स्त्री १४ लाख ४९ हजार ५६० आणि इतर ९४ असे एकूण २९ लाख ७६ हजार ८०५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. निवडणूक कामकाजाकरिता २३ हजाराहून अधिक कर्मचारी कार्यरत सर्व मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आदी अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून संपूर्ण निवडणूक कामकाजाकरिता एकूण २३ हजार ११४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पर्याप्त व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलींग पार्टी सर्व साहित्यासहित आपआपल्या मतदान केंद्रावर पोहोचल्या असून मतदान प्रक्रियेसाठी सुसज्ज आहेत. निवडणूकीच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहेत. मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत मतदानाची टक्केवारीत वाढ होण्याकरिता विविध प्रकारचे जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले आहे.
मतदानाकरिता सार्वजनिक सुट्टी
मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यक्षेत्रात ३ फेब्रुवारीच्या महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेद्वारे शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सार्वजनिक सुट्टी मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना सुद्धा लागू राहील. केंद्र शासनाच्या शासकीय, निम्न शासकीय कार्यालय, सार्वजनिक उपक्रम बँका आदींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाकरिता जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यात ३ हजार ६०५ मतदान केंद्र
बारामती तालुक्यात २९९, मावळ २४३, मुळशी २२७, शिरुर ३३७, हवेली २६३, दौंड ३१७, इंदापूर ४००, पुरंदर २३५, भोर २३७, वेल्हे १०५, आंबेगाव २३९, जुन्नर ३६६ आणि खेड ३३७ तालुक्यात असे एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्र आहेत. यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १३ आदर्श व महिला मतदान केंद्र तसेच हवेली, भोर आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी १ याप्रमाणे ३ परदानशीन मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रियेकरिता १४ हजार ३१८ बॅलेट युनिट, ५ हजार ८१३ कंट्रोल युनिट यंत्र, मेमरी चीप ३ हजार ९६८, बॅटरी ३ हजार ९९१ वितरित करण्यात आले आहेत.