केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अन् जिल्हा परिषद निवडणूक एकाच दिवशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:56 IST2026-01-30T15:56:04+5:302026-01-30T15:56:29+5:30
- परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; अन्यथा विद्यार्थी मतदानापासून राहणार वंचित

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अन् जिल्हा परिषद निवडणूक एकाच दिवशी
पुणे : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराला गती आलेली असतानाच विमान दुर्घटनेत बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयाेगाने नियाेजित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमात बदल करत मतदानाची तारीख दाेन दिवस पुढे ढकलली आहे.
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पूर्वनियाेजनानुसार ७ फेब्रुवारीला हाेणार आहे. नवीन बदलांनुसार जिल्हा परिषद निवडणूक मतदान आणि परीक्षा एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेणार असून, अनेक जण मतदानापासून वंचित राहणार आहेत.
दरम्यान, विमान दुर्घटनेनंतर राज्य सरकारने एकदिवसाची सुटी आणि तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला हाेता. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयाेगाने निवडणूक कार्यक्रमात बदल केला आहे. त्याचा फटका परीक्षार्थींना बसणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचे मतदान केंद्र आणि परीक्षा केंद्र दूरदूर असल्याने मतदानाचा हक्क कसा बजावणार आणि परीक्षा कशी देणार, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
मतदानाचा हक्क बजावणार कसा?
मी स्वप्निल कदम. मूळचा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात पिंपळा खुर्द गावचा. मी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे. सदर परीक्षा ७ फेब्रुवारीला हाेणार असून, परीक्षा केंद्र मुंबई मिळाले आहे. मात्र, त्याच दिवशी माझ्या पंचायत समिती गण व जिल्हा परिषद क्षेत्रातील मतदान आहे. त्यात माझा मतदानाचा हक्क जात आहे. परीक्षा देणार की मतदानाचा हक्क बजावणार? माझ्यासारखे अनेक विद्यार्थी मतदानापासून वंचित राहत आहेत. ही गैरसाेय विचारात घेऊन सरकारने परीक्षा पुढे ढकलावी.
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्याच्या प्रचाराला वेग आलेला असतानाचा उपमुख्यमंत्र्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परिणामी नियाेजित ५ फेब्रुवारीला होणारे मतदान दाेन दिवस पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे मतदान ७ फेब्रुवारीला होणार आहे. मात्र, त्याचं दिवशी केंद्रीय शिक्षक भरतीसाठीची परीक्षा आहे. यात विद्यार्थ्यांची हाेणारी गैरसाेय विचारात घेऊन ७ फेब्रुवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहाेत. - महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन