Zilla Parishad Election : शिरूर तालुक्यातील उमेदवारांच्या एनवेळी मिळेल 'त्या' पक्षात उड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:43 IST2026-01-22T13:42:51+5:302026-01-22T13:43:45+5:30
उमेदवारी कापल्याने नाराज झालेल्या इच्छुकांमुळे कोणताही झेंडा हातात घेऊन मैदानात उतरण्याचीच चढाओढ पाहायला मिळाली.

Zilla Parishad Election : शिरूर तालुक्यातील उमेदवारांच्या एनवेळी मिळेल 'त्या' पक्षात उड्या
शिरूर : जिल्हा परिषदेच्या शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले. आज जिल्हा परिषदेच्या सात गटांसाठी एकूण २८ उमेदवारांनी, तर १४ पंचायत समिती गणांसाठी ६२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट वाटपाचा ताण, एबी फॉर्मसाठीची धावपळ आणि उमेदवारी कापल्याने नाराज झालेल्या इच्छुकांमुळे कोणताही झेंडा हातात घेऊन मैदानात उतरण्याचीच चढाओढ पाहायला मिळाली.
राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने सर्व उमेदवारांना ‘घड्याळ’ हेच चिन्ह देण्यात आले. मात्र यामुळेच अनेक ठिकाणी प्रचंड गोंधळ निर्माण झाला. टाकळी हाजी-कवठे येमाई गटातून तिकीट मिळणार नाही, हे लक्षात येताच माजी आमदार पोपटराव गावडे व त्यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. या गटातून राष्ट्रवादीकडून दामूअण्णा घोडे यांना उमेदवारी देण्यात आली.
शिरूर-न्हावरे गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सरचिटणीस तृप्ती सरोदे यांना एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी शिंदे शिवसेनेकडून अर्ज भरला. या गटातून अखेर वृषाली वाळके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली. भाजपकडून अपेक्षेप्रमाणे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे यांना उमेदवारी मिळाली.
वडगाव-मांडवगण गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रबळ दावेदार मानले जाणारे दादा पाटील फराटे यांचे तिकीट कापून माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या पाटील यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत ओबीसी जागेचा दावा करणारे माजी सभापती दादासाहेब कोळपे यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला.
कर्पे, रणदिवे शिंदेसेनेत तर मांढरे अपक्ष
तळेगाव-रांजणगाव सांडस गटात राष्ट्रवादी पवार गटाच्या सारिका राहुल कर्पे यांचे तिकीट कापल्याने त्यांनी शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी स्वीकारली. मात्र शेवटच्या क्षणी लोकशाही क्रांती आघाडीच्या माजी सदस्य रेखा बांदल यांना राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. रांजणगाव गणात एबी फॉर्म न मिळाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल रणदिवे यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. न्हावरे गणात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सागर खंडागळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
पाबळ गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास गायकवाड, तर पाबळ गणातून दीपक खैरे यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी भाजपची उमेदवारी स्वीकारली. शिक्रापूर गणात शिंदे शिवसेनेचे रामभाऊ सासवडे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र शिक्रापूर गटातून राष्ट्रवादीच्या प्रमुख दावेदार कुसुम आबाराजे मांढरे यांना एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.