ZP Election 2026: युती, बंडखोरी आणि अपक्षांची खेळी ..! पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत कोण मारणार बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 10:24 IST2026-02-07T10:23:59+5:302026-02-07T10:24:47+5:30

युती, बंडखोरी, स्थानिक समीकरणांमुळे अनेक ठिकाणी चुरस

Zilla Parishad Election Alliance, rebellion and the play of independents..! Who will win the Pune Zilla Parishad elections? | ZP Election 2026: युती, बंडखोरी आणि अपक्षांची खेळी ..! पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत कोण मारणार बाजी?

ZP Election 2026: युती, बंडखोरी आणि अपक्षांची खेळी ..! पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत कोण मारणार बाजी?

पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, शनिवारी मतदान होत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे कोणत्याही पक्षाने जाहीर सभा न घेतल्या तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर चुरशीची लढत रंगली आहे. बहुतांश गटांमध्ये अपक्ष उमेदवारांच्या एन्ट्रीमुळे काहींची डोकेदुखी वाढली, तर काहींसाठी अपक्ष आधार ठरत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची विभागणी झाल्यानंतर अनेक इच्छुकांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सक्षम उमेदवारांची कमतरता आणि स्थानिक गणितांमुळे शक्य तेथे युतीचा मार्ग स्वीकारण्यात आला. त्यानुसार काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदेगट असे तीन पक्ष एकत्र आल्याचे चित्रही दिसून येत आहे. ज्यांना कोणत्याही आघाडीत स्थान मिळाले नाही, त्यांनी थेट अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील ७३ जिल्हा परिषद गटांसाठी २९९ उमेदवार रिंगणात असून, त्यांपैकी ६१ उमेदवार अपक्ष आहेत. बहुतांश गटांमध्ये प्रमुख लढती राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात असल्या, तरी स्थानिक समीकरणे, बंडखोरी आणि उमेदवारी न मिळाल्याची नाराजी यांमुळे अनेक ठिकाणी चित्र बदलण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. तरीही आंबेगाव, मावळ आणि मुळशी तालुक्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार परस्परविरोधात उभे आहेत. एकूण ५८ ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे.

चार सहकारी संस्थांना आयोगाची नोटीस

दरम्यान, निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील चार सहकारी संस्थांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी), पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच बारामती तालुका दूध संघ आणि बारामती खरेदी–विक्री संघ यांना ही नोटीस देण्यात आली आहे. आचारसंहिता लागू असताना कात्रज दूध संघाने पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याची घोषणा व ठराव, तसेच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने फुलांच्या बाजाराला अजित पवार यांचे नाव देण्याची घोषणा केली. बारामती तालुका दूध संघ आणि खरेदी–विक्री संघांनीही अशाच स्वरूपाच्या घोषणा केल्याने हा आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा निष्कर्ष काढत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाने संबंधित संस्थांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

Web Title : पुणे जिला परिषद चुनाव: गठबंधन, विद्रोह और निर्दलीय मैदान में!

Web Summary : पुणे जिला परिषद चुनाव में गठबंधन और निर्दलीय उम्मीदवारों के बीच कड़ी टक्कर है। पवार के निधन के बावजूद, एनसीपी और भाजपा आमने-सामने हैं, विद्रोही गुटों ने परिदृश्य को जटिल बना दिया है। चार सहकारी संस्थाओं को चुनाव आचार संहिता के उल्लंघन के लिए नोटिस भी जारी किए गए।

Web Title : Pune Zilla Parishad Election: Alliances, Rebellion, and Independents in the Fray!

Web Summary : Pune ZP elections see fierce local battles amid alliances and independent candidates. Despite Pawar's death, NCP and BJP face off, with rebel factions complicating the landscape. Four co-operative organizations were also issued notices for violating election codes.