Zilla Parishad Election : जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ६४१ अर्ज, आजपासून उमेदवारी अर्जांची छाननी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 09:27 IST2026-01-23T09:26:49+5:302026-01-23T09:27:40+5:30
पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी १ हजार १६५ अर्ज

Zilla Parishad Election : जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ६४१ अर्ज, आजपासून उमेदवारी अर्जांची छाननी
पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात बुधवारी (दि. २१) ७३ गटांसाठी तब्बल ६४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी १ हजार १६५ अर्ज आले आहेत. इंदापूर तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या गटांसाठी सर्वाधिक ११४ अर्ज दाखल झाले असून, पंचायत समितीच्या गणांसाठीही इंदापूर तालुक्यातूनच सर्वाधिक २१३ अर्ज आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. अर्जांची छाननी गुरुवारी, तर २७ जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने बुधवारी (दि.२१) दिवसभर तहसील कार्यालये व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये मोठी गर्दी उसळली होती. दुपारी उशिरापर्यंत उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या रांगा लागल्या होत्या. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पंचवार्षिक निवडणुकीची मुदत संपल्यानंतर चार वर्षांच्या खंडानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होत असल्याने इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यातच बुधवारपर्यंत युती व आघाडीच्या समीकरणांबाबत संभ्रम कायम असल्याने अनेक इच्छुकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे चित्र दिसून आले.
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर गुरुवारी (दि. २२) अर्जांची छाननी झाली. त्यानंतर वैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. आज शुक्रवारपासून (दि.२३) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू होईल, तर बुधवार दि. २७ जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे.
दौंड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटांसाठी ९८, तर पंचायत समितीच्या गणांसाठी १३७ अर्ज दाखल झाले आहेत. शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटांसाठी ५३, तर पंचायत समितीच्या गणांसाठी १०५ अर्ज दाखल झाले आहेत. खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटांसाठी ४९, तर पंचायत समितीच्या गणांसाठी १०० अर्ज दाखल झाले आहेत. पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटांसाठी ३९, तर पंचायत समितीच्या गणांसाठी ९० अर्ज दाखल झाले आहेत.
-----------
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तब्बल ५ हजार ८६४ उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चुरशीच्या लढती पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
---------
तालुकानिहाय उमेदवारी अर्ज दाखल
तालुका --जि. प.--पं. स.
जुन्नर – ३८ – ७२
आंबेगाव – २५ – ५२
शिरूर – ५३ – १०५
खेड – ४९ – १००
मावळ – २७ – ५२
मुळशी – ३३ – ८८
हवेली – ४४ – ८२
दौंड – ९८ – १३७
पुरंदर – ३९ – ९०
वेल्हे – २० – ३६
भोर – ३८ – ४६
बारामती – ६३ – ९२
इंदापूर – १२६ – २१३