Pune: ट्रेलर ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू ; वाघोलीत नगर रोडवरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 13:53 IST2023-12-16T13:52:17+5:302023-12-16T13:53:22+5:30
याप्रकरणी ट्रेलर ट्रक चालकावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

Pune: ट्रेलर ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू ; वाघोलीत नगर रोडवरील घटना
वाघोली (पुणे) : कामावर निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या मोठ्या ट्रेलर ट्रकने धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१२) सकाळी सव्वा सहाच्या सुमारास वाघोली गाडे वस्ती येथे नगर-पुणे रोडवर चार्मी हॉटेल जवळील परफेक्ट वजन काट्यासमोर घडली. याप्रकरणी ट्रेलर ट्रक चालकावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्नील कांतीलाल सोनवणे (वय २६, रा. कटकेवाडी, वाघोली) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गणेश आरे (रा. विठ्ठलवाडी, वाघोली) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत स्वप्नील सोनवणे हा फिर्यादी गणेश आरे यांच्याकडे कामाला होता. मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास स्वप्नील त्याच्या दुचाकीवरून वाघोली बकोरी फाटा येथील ऑफिसमध्ये कामासाठी जात होता. त्यावेळी पाठीमागून एक ट्रेलर ट्रक भरधाव वेगात आला. ट्रक चालकाने बेदरकार वाहन चालवून फिर्यादी यांच्या कामगाराच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन सोनवणे याचा मृत्यू झाला असून या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले आहे. पुढील तपास लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस करीत आहेत.