लोणावळ्यातील गिधाड तलाव धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 18:58 IST2019-07-30T17:15:30+5:302019-07-30T18:58:58+5:30
काही युवक लोणावळा परिसरातील लायन्स पॉईट परिसरात पर्यटनाला आले होते.

लोणावळ्यातील गिधाड तलाव धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू
लोणावळा : शहर परिसरात वर्षाविहाराला आलेल्या पुण्यातील एका युवकाचा लायन्स पॉईंट जवळील गिधाड तलाव धबधब्यात पडून मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.
श्रीराम दुर्ज साहू (वय 24, मूळ रा. पांड्या पुरुषोत्तमपुर,ओडीसा. सध्या रा. सणसवाडी, पुणे) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा मित्र संजयकुमार साहू याने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात श्रीराम याच्या मृत्युची माहिती दिली.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम, संजयकुमार व त्याचे अन्य दोन मित्र असे चार जण आज सकाळी लोकलने लोणावळ्यात वर्षाविहाराला आले होते. भुशी धरणाजवळ एका हॉटेलात त्यांनी मद्य सेवन करत जेवण केले. त्यानंतर भुशी धरणावर फिरुन ते गिधाड तलाव परिसरात गेले असता तेथील धबधब्यात श्रीराम याने वरुन उडी मारली, धबधबा खोल व खाली दगड असल्याने गंभिर मार लागून त्याचा पाण्यात मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.