पुणे: पोलिसांनी पुण्यात अडवून पोलिस ठाण्यात तंबी दिल्यानंतर तिथून सुटून युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जनआक्रोश यात्रा पुढे जाऊन सुरू ठेवली. रविवारी पिंपरी-चिंचवड, तिथून पुढे मुंबई मार्गावर ही यात्रा रवाना झाली. पुण्यातील पोलिसांच्या वागणुकीचा युवक काँग्रेसने निषेध केला.
लाल महाल ते मुंबई अशी पदयात्रा युवक काँग्रेसने जाहीर केली होती. त्याला शनिवारी सायंकाळी सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी लगेचच शिवाजीनगरजवळ यात्रा अडवली. सर्व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ठेवले. परवानगी नसतानाही मोर्चा काढल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. रात्री उशिरा त्यांना सोडून देण्यात आले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, कार्याध्यक्ष शिवराज मोरे, सरचिटणीस अक्षय जैन, प्रथमेश आबनावे व अन्य पदाधिकारी यात होते.
या सर्वांनी अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुढे बोलावून रात्री यात्रा सुरू ठेवली. पिंपरी-चिंचवडमध्ये ते रात्री उशिरा पोहोचले. तिथून रविवारी त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केले. बेरोजगारी संपवण्यात सरकारला आलेले अपयश, जातीधर्मात सरकारी पाठिंब्याने सुरू असलेली विभागणी, अंमली पदार्थांच्या तस्करीकडे होत असलेले दुर्लक्ष याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसने ही यात्रा जाहीर केली आहे. १९ मार्चला मुंबईत पोहोचून तिथे विधानसभेला घेराव घालण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.