Pune: खडकवासला धरणात उडी मारून तरुणाची आत्महत्या, घरगुती वादामुळे संपविले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 20:04 IST2023-10-05T20:02:33+5:302023-10-05T20:04:11+5:30
खडकवासला धरणाच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या...

Pune: खडकवासला धरणात उडी मारून तरुणाची आत्महत्या, घरगुती वादामुळे संपविले जीवन
धायरी (पुणे) : घरगुती वादातून एका तरुणाने खडकवासला धरणाच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. गुरुवारी (दि. ५) सकाळी पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. स्वप्निल रामभाऊ कणसे (वय ३४, मूळ रा. लोखंडी सावरगाव, ता. अंबेजोगाई, जि. बीड, सध्या रा. सिद्धी हाईट्स, शिवणे, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्वप्निल पेंटिंगचे काम करीत होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने त्याचे घरातील इतर सदस्यांसोबत वारंवार लहान-मोठे वाद होत होते. बुधवारी वाद झाल्यानंतर तो घरातून निघून गेला होता. स्वप्निल घरी परत न आल्याने त्याच्या आईने उत्तमनगर पोलिस ठाण्यात धाव घेत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. गुरुवारी सकाळी १०च्या सुमारास खडकवासला धरणाच्या ११ नंबर मोरीजवळ पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी याबाबत हवेली पोलिस ठाण्यात माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नीलेश राणे, विलास प्रधान, दिनेश कोळेकर, दीपक गायकवाड, महेंद्र चौधरी, प्रवीण ताकवणे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. विभागीय अग्निशमन अधिकारी सूरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएमआरडीएच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. पुढील तपास हवेली पोलिस करीत आहेत.