Youngster abused naked in Pune for demanding money | पुण्यात तरुणाची नग्नधिंड ; पैशांच्या मागणीसाठीचा धक्कादायक प्रकार 
पुण्यात तरुणाची नग्नधिंड ; पैशांच्या मागणीसाठीचा धक्कादायक प्रकार 

पुणे : पैशांच्या मागणीसाठी काही तरुणांनी मिळून एका तरुणाची नग्न अवस्थेत धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. माणुसकीला काळीमा लावणारी ही घटना पुण्यातील हडपसर व खराडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत तरुण हा मूळ कर्नाटक राज्यातील असून त्याने काही दिवसांपूर्वी पुण्यात गाडी दुरुस्तीचा व्यवसाय सुरु केला आहे. १६ तारखेला त्याच्याकडे जॅग्वार कंपनीची गाडी दुरुस्तीस आली. ही गाडी आरोपींच्या ओळखीने त्याच्याकडे दुरुस्तीस आली होती. त्यावेळी आरोपींनी त्याला दुरुस्तीच्या खर्चापेक्षा पाच लाख रुपये अधिक घेण्यास सांगितले, मात्र पिडीत तरुणाने अडीच लाख रुपये घेतले. त्याच रागातून  १६नोव्हेंबरच्या रात्री आठ तरुणांनी त्याला कोंढवा येथील गॅरेजमधून उचलले आणि हडपसर आणि खराडी परिसरात नेले. तेथे त्याचे कपडे उतरवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.  तसेच त्याची नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. त्याला सिगरेटचे चटके देण्यात आल्याचा आरोपही त्याला केला आहे. शेवटी त्याला पहाटे साडेतीन वाजता गॅरेजजवळ सोडून आरोपी निघून गेले.  या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. 

Web Title: Youngster abused naked in Pune for demanding money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.