Pune Crime: 'टास्क फ्रॉड' मध्ये तरुणीला ७ लाखांचा गंडा; सिंहगड रोड परिसरातील घटना
By भाग्यश्री गिलडा | Updated: July 5, 2023 16:39 IST2023-07-05T16:38:40+5:302023-07-05T16:39:15+5:30
मार्केटींग कंपनीमार्फत देण्यात आलेले टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला मिळवून देतो असे तरुणीला सांगण्यात आले...

Pune Crime: 'टास्क फ्रॉड' मध्ये तरुणीला ७ लाखांचा गंडा; सिंहगड रोड परिसरातील घटना
पुणे : टास्क पूर्ण केल्यास चांगले पैसे मिळतील असे आमिष दाखवून एका तरुणीची फसवणूक केल्याची घटना सिंहगड रोड परिसरात घडली आहे. एका २८ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, निराली शर्मा, ऋत्विक सिंग आणि जगदीश पुरी यांनी संगनमताने मार्केटिंग कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून तरुणीची फसवणूक केली आहे.
मार्केटींग कंपनीमार्फत देण्यात आलेले टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला मिळवून देतो असे तरुणीला सांगण्यात आले. सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन तरुणीचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यांनतर प्रीपेड टास्क करावे लागतील असे सांगून त्यासाठी डिपॉजिट भरावे लागेल असे तिला सांगण्यात आले. वेगवेगळी कारणे देत तरुणीकडून तब्बल ७ लाख १६ हजार ८०२ रुपये उकळले.
काही कालावधीनंतर गुंतवणूक केलेल्या पैशांचा मोबदला न मिळाल्याने तरुणीने विचारणा केली. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजूरकर हे करत आहेत.