विद्युत डीपीवर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; पुण्याच्या हिंजवडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 15:54 IST2021-12-27T15:53:50+5:302021-12-27T15:54:01+5:30
तरुणाला पुढील उपचारासाठी जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे

विद्युत डीपीवर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; पुण्याच्या हिंजवडीतील घटना
हिंजवडी : हिंजवडी माण रस्त्यावर असलेल्या विद्युत डीपीवर चढून तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या जवानांमुळे तरुणाचे प्राण वाचले असून, त्याला पुढील उपचारासाठी जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. सोमवारी (दि.२७) दुपारी साडे बाराच्या सुमारास माण रस्त्यावरील वडजाई नगर येथे ही घटना घडली.
अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर एक अज्ञात तरुण दुपारच्या सुमारास अचानक विद्युत डीपीवर चढल्याने स्थानिक नागरिकांची एकच तारांबळ उडाली. प्रसंगावधान साधत ग्रामस्थांनी एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना दिल्याने तात्काळ विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, तरुणाला खाली येण्याची विनंती केल्यानंतर तो खाली उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, आपल्या अनुभवाचा जोरावर मोठ्या शीताफीने टप्पा क्रमांक एक मधील अग्निशमन दलाच्या जवनांनी तरुणाला लोखंडी शिडीच्या साहाय्याने खाली उतरवले.
दरम्यान, उष्ण विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने अज्ञात तरुण काही प्रमाणात भाजल्याने त्यास तात्काळ खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी विद्युत विभागाचे अधिकारी समवेत अग्निशमन विमोचक चंद्रशेखर मतकर, कर्मचारी दत्ता खेडेकर, प्रविण पिंगळे, निखिलेश शिवगन उपस्थित होते.