तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल! केरळमधील एका गावात चारशेहून अधिक कुटुंबांना जुळी मुले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 11:22 IST2025-09-03T11:21:27+5:302025-09-03T11:22:17+5:30
आतापर्यंत बऱ्याच वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे; पण ते का घडते? याचे रहस्य अजून उलगडले नाही

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल! केरळमधील एका गावात चारशेहून अधिक कुटुंबांना जुळी मुले
पुणे : केरळमधील कोडिन्ही ही चारशेहून अधिक कुटुंब असेलेली ग्रामपंचायत आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या गावात सगळ्यांनाच जुळी मुले आहेत. या गावाला ‘जगाची जुळ्यांची राजधानी’ म्हणून संबोधले जाते. कुणी गाव सोडून दुसऱ्या शहरात गेले तरी त्यांना तिकडेदेखील जुळेच होते. हे कसं! याचं कोडं आजतागायत भल्याभल्यांनादेखील उलगडले नाही. यासंदर्भात आतापर्यंत बऱ्याच वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे; पण ते का घडते? याचे रहस्य अजून उलगडले नाही. १९४९ मध्ये पहिल्या जुळ्या मुलांची जोडी तिथे जन्माला आली. त्यानंतर १९८२ च्या सुमारास एका शाळेत लक्षात आले की त्या गावात अनेक जुळे होते.. असा अनुभव गावाच्या सरपंच तसलीना यांनी मंगळवारी ‘जुळ्यांच्या संमेलनात सांगितला अन् सर्वांच्याच चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले.
पुणे फेस्टिव्हलअंतर्गत महाराष्ट्रात सरपंच म्हणून करण्यात आलेला माझा सन्मान हा माझा नव्हे, तर संपूर्ण कोडिन्ही गावाचा सन्मान आहे. अशा शब्दांत कोडिन्ही गावाच्या सरपंच तसलीना यांनी कृतज्ञता व्यक्त केली. बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवारी (दि. २) दुपारी जुळ्यांचे संमेलन झाले. या अनोख्या कार्यक्रमात १२५ हून अधिक जुळ्यांची नोंदणी झाली होती, तर ५० हून अधिक जुळ्या जोड्या प्रत्यक्ष उपस्थित होत्या. सेम टू सेम दिसणारे जुळे पाहून उपस्थितदेखील चक्रावून गेले होते. त्यांच्या चेहऱ्यामध्ये इतके साम्य होते की आई-वडील किंवा शाळेतील शिक्षक मंडळी किंवा मित्र-मैत्रिणी त्यांना कशी ओळखत असतील? असा प्रश्न अनेकांना पडला. मंचावर लव-कुश यांचे भव्य चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या कार्यक्रमात जुळ्यांचा क्लब स्थापन करीत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यावेळी सर्वांनी टाळ्यांचा कडकडात करून प्रतिसाद दिला
डाॅक्टर आणि शिक्षक अशी एक जुळ्यांची जोडी. त्यातील शिक्षक बहिणीने अनुभव कथन केला. शिक्षिका म्हणाली, माझ्या बहिणीने तिच्या ओळखीमधील कुणीतरी डाॅक्टर महिला घरी येणार होत्या, म्हणून मला त्यांना घेण्यासाठी खाली पाठवले. मी खाली गेल्यावर तुम्ही... याच डाॅक्टर ना, असा प्रश्न त्यांना केला. तेव्हा त्या माझ्यावर रागावल्या. तू मला ओळखत नाहीस का? मी तिची जुळी बहीण आहे असे सांगितल्यावरपण त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यानंतर डाॅक्टर बहीण खाली आली; पण त्यांचा विश्वासच बसत नव्हता. आम्ही दोघी जेव्हा त्यांच्यासमोर आलो तेव्हा त्या आम्हाला पाहून थक्कच झाल्या, हे त्यांनी सांगताच सभागृहात हसूनहसून पुरेवाट झाली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक ॲड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई व बालगंधर्व रंगमंदिर सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू यावेळी उपस्थित होते.
वंदना चव्हाण म्हणाल्या की, पुण्याचा सांस्कृतिक वारसा वाढवण्याच्या दृष्टीने हे कार्यक्रम होत असतात आणि त्याच्यात आज हे जुळ्यांचं संमेलन होतंय, हे खरंच खूप आनंद देणारं आहे.