तुम्ही तयारीला लागा, पुढच्या बैठकीत अधिकचे ठरवू; राज ठाकरेंचा प्रमुख पदाधिकाऱ्यांना आदेश

By राजू इनामदार | Updated: June 9, 2025 19:32 IST2025-06-09T19:32:37+5:302025-06-09T19:32:45+5:30

राज्यात सध्या शिवसेना (उद्धव ठाकरे) व मनसे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे, मात्र राज यांनी यासंदर्भात काहीच विषय काढला नाही

You start preparing, we will decide more in the next meeting Raj Thackeray orders key office bearers | तुम्ही तयारीला लागा, पुढच्या बैठकीत अधिकचे ठरवू; राज ठाकरेंचा प्रमुख पदाधिकाऱ्यांना आदेश

तुम्ही तयारीला लागा, पुढच्या बैठकीत अधिकचे ठरवू; राज ठाकरेंचा प्रमुख पदाधिकाऱ्यांना आदेश

पुणे: तुम्ही तयारीला लागा, पुढच्या बैठकीत अधिकचे काय ते ठरवू असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले. पक्ष कार्यालयात सोमवारी सकाळी राज यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्राथमिक नियोजनाची चर्चा केली.

पक्षाचे सरचिटणीस अनिल शिदोरे, संपर्क नेते बाबू वागसकर, प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस, गणेश सातपुते, रणजित शिरोळे, प्रदेश प्रवक्ते योगेश खैरे, अजय शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, जिल्हा संघटक प्रशांत कनोजिया, आशिष साबळे अशा १३ जणांच्या कोअर कमिटीची बैठक राज यांनी घेतली. महापालिका निवडणुकीसंदर्भात त्यांनी चर्चा केली.

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राज यांनी पदाधिकाऱ्यांकडून शहराचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांना मतदारांबरोबर संपर्क साधण्यासाठी तयार करावे, स्थानिक समस्या कशा सोडवता येतील यासाठी प्रयत्न करावेत, सर्वसामान्य नागरिकांना पक्षाची, पक्षाच्या ध्येयधोरणाची माहिती द्यावी, मतदारांबरोबर सततचा संपर्क ठेवावा अशा सुचना राज यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.

राज्यात सध्या शिवसेना (उद्धव ठाकरे) व मनसे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे. मात्र राज यांनी यासंदर्भात काहीच विषय काढला नाही. पदाधिकाऱ्यांनीही याबाबत काही विचारले नाही. महापालिका निवडणूक आपण लढवणार आहोत, त्यासाठीच्या तयारीला लागा, पुढचा तपशील पुढील बैठकीत ठरवू, पुढील महिन्यात मी परत पुण्यामध्ये येणार आहे असे राज यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. राज सोमवारी पुण्यात मुक्कामी आहेत. खासगी कामासाठी ते थांबले असल्याचे समजते. मंगळवारी पक्ष कार्यालयात किंवा इतरत्रही त्यांनी बैठक वगैरेचे नियोजन केलेले नाही.

Web Title: You start preparing, we will decide more in the next meeting Raj Thackeray orders key office bearers