योगेश जांभुळकर यांनी उंचावली देशाची मान;रशियात पार पडलेल्या पावरलिफ्टिंग स्पर्धेत मिळविले सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:14 IST2025-12-12T12:12:31+5:302025-12-12T12:14:58+5:30
दोन महिन्यांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या नॅशनल पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी उल्लेखनीय प्रदर्शन करत दुसरा क्रमांक पटकावला होता

योगेश जांभुळकर यांनी उंचावली देशाची मान;रशियात पार पडलेल्या पावरलिफ्टिंग स्पर्धेत मिळविले सुवर्णपदक
महादेव मासाळ
पिंपळे गुरव - पिंपळे गुरवचे सुपुत्र योगेश दत्तात्रय जांभुळकर यांनी पॉवरलिफ्टिंग क्षेत्रात दमदार कामगिरी करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा उंचावला आहे. मॉस्को, रशिया येथे ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या वर्ल्ड पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत योगेश जांभुळकर यांनी ७५ किलो वजनी गट, मास्टर कॅटेगरीत चार सुवर्णपदके आणि एक कांस्यपदक जिंकत भारतासाठी ऐतिहासिक यश संपादन केले. त्यांच्या या भव्य यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून मायदेशी परतल्यानंतर पिंपळे गुरव ग्रामस्थ तसेच मित्रपरिवाराने त्यांचा सत्कार करून अभिमान व्यक्त केला.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या नॅशनल पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी उल्लेखनीय प्रदर्शन करत दुसरा क्रमांक पटकावला होता. या कामगिरीच्या जोरावरच त्यांची रशियातील आंतरराष्ट्रीय वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड झाली. त्या ठिकाणच्या जागतिक स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदकांची कमाई करत प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेत दमदार कामगिरी करत यशस्वी होऊन भारतात परतल्यानंतर पिंपळे गुरव ग्रामस्थ व मित्रपरिवार तसेच कुटुंबातील सदस्यांनी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली. परिवारातील महिला सदस्यांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे औक्षण करत उत्स्फूर्त स्वागत केले. तसेच येथील ‘राजमाता जिजाऊ उद्यान ग्रुप’ यांच्या वतीने योगेश जांभुळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
हे यश मिळवण्यासाठी योगेश यांनी कठोर मेहनत, नियमित सराव आणि नियंत्रित आहाराचे काटेकोर पालन केले. त्यांचे हे घवघवीत यश म्हणजे त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांची पावती असून त्यांनी पिंपरी–चिंचवड, पुणे तसेच महाराष्ट्र आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे.