येळकोट येळकोट जय मल्हार..! चंपाषष्ठी उत्सवनिमित्त जेजुरी गडावर भंडारा खोबऱ्याची उधळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 19:02 IST2024-12-07T19:01:00+5:302024-12-07T19:02:54+5:30

खंडोबाच्या वर्षकाठी भरणाऱ्या आठ यात्रा उत्सवांपैकी चंपाषष्ठी उत्सवाला मोठे महत्त्व आहे.

Yelkot Yelkot Jai Malhar..! | येळकोट येळकोट जय मल्हार..! चंपाषष्ठी उत्सवनिमित्त जेजुरी गडावर भंडारा खोबऱ्याची उधळण

येळकोट येळकोट जय मल्हार..! चंपाषष्ठी उत्सवनिमित्त जेजुरी गडावर भंडारा खोबऱ्याची उधळण

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर चंपाषष्ठीचे औचित्य ‘सदानंदाचा येळकोट’ ‘येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडारा खोबऱ्याच्या उधळणीत भाविकांनी रांगा लावून कुलदैवताचे दर्शन घेतले. गडावर आणि शहरात सर्वत्र कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक कार्यक्रम, तसेच देवाचा जयघोष ऐकू येत होता. भंडार खोबऱ्याच्या मुक्त हस्ताने करण्यात आलेल्या उधळणीमुळे संपूर्ण गडकोट आणि प्रमुख रस्ते पिवळ्या जर्द भंडाऱ्याने माखल्यामुळे सोन्याच्या जेजुरीचा भास होत होता.

खंडोबाच्या वर्षकाठी भरणाऱ्या आठ यात्रा उत्सवांपैकी चंपाषष्ठी उत्सवाला मोठे महत्त्व आहे, मणी मल्ल दानवांच्या संहारासाठी शंभू महादेवाचे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या कालावधीत घनघोर युद्ध झाले. युद्धात मणीचा अंत झाला आणि मल्ल शरण आला. विजयानंतर ऋषी मुनींनी चाफ्याच्या फुलांनी, भंडार खोबरे उधळून देवाची पूजा करून विजय दिवस साजरा केला अशी आख्यायिका असून, तेव्हापासून हा उत्सव साजरा होत आहे. तोच हा चंपाषष्ठी उत्सव.

आज सकाळी देवाची महापूजा, महाभिषेकानंतर बालदारीतील घट उठवण्यात आले. त्यानंतर घराघरांतीलही घट उठले. देवाला वांगे भरीताचा नैवेद्य दाखवून उत्सवाचा उपवास सोडण्यात आला. दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या कालावधीत जेजुरी गडावर चंपाषष्टी उत्सव साजरा होतो. चंपाषष्ठीचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी हजारो भाविक जेजुरी गडावर येऊन भंडार खोबऱ्याची मुक्त हस्ताने उधळण करीत कुलदैवतचा जयजयकार करीत होते. दर्शन रांगेतून कुलदैवताचे दर्शन घेत होते.

 भरीत रोडग्याचा नैवेद्य

आषाढ नवमीला कांदे नवमी असे ही म्हटले जाते. नवमीपासून खंडोबा भक्त कांदे, लसूण, वांगे खाण्यास वर्ज्य करीत असतात. यालाच चातुर्मास असेही संबोधले जाते. शनिवारी मात्र कुलदैवतला भरीत वांगे कांद्याचा नैवेद्य अर्पण करून हे पदार्थ खाण्यास सुरुवात करतात. सकाळपासूनच जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी होती. सोबत भरीत रोडग्याचा नैवेद्य कुलदैवताला मोठ्या भक्तिभावाने अर्पण करीत होते, तर येथील जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानने भाविकांसाठी भरीत रोडग्याचा समावेश असलेल्या मिष्टान्न महाप्रसादाची सोय केली होती. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
 

Web Title: Yelkot Yelkot Jai Malhar..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.