Valentine Day 2025: कुस्तीचा गेम; मित्रासोबत आखाड्यातचं जुळले प्रेम अन् पुढे बांधली लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 15:25 IST2025-02-14T15:24:30+5:302025-02-14T15:25:14+5:30
दोघही वेगळ्या जिल्ह्यातील असल्याने आम्ही नॅशनलच्याच माध्यमातून वर्षातून एकदाच भेटायचो, त्यानंतर चांगले मित्र झालो

Valentine Day 2025: कुस्तीचा गेम; मित्रासोबत आखाड्यातचं जुळले प्रेम अन् पुढे बांधली लग्नगाठ
पुणे : आयुष्याचा जोडीदार आपल्याच क्षेत्रातील असावा असा आग्रह मी धरला होता. लहानपणापासून कुस्ती क्षेत्रातच करिअर करायचं असं माझं स्वप्न होतं, आणि ते मी सत्यात उतरवलं ते माझ्या साथीदाराच्या सोबतीने. कुस्तीत शक्यतोवर महिलांना लग्नानंतर करिअर करण्याची संधी नसते. मात्र, मला भक्कम पाठिंबा सासुबाईंकडूनचं मिळाल्याचे पै. भाग्यश्री फंड-कोळी सांगतात.
'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सर्वांचं सेम असतं', असे आजची तरुणाई बिनधास्तपणे म्हणू लागली आहे. प्रेम करणे वाईट नाही, म्हणून बेधडकपणे स्वत:च्या भावना व्यक्त करण्याकडे तरुणाईचा कल असतो, मात्र आमच्या बाबतीत असं काही घडलंच नाही. प्रत्येक मुलगी आयुष्याचा जोडीदार निवडताना तो दिसायला देखणा असावा, तो नोकरीला असावा, त्याचबरोबर त्याच्याबरोबर आपलंही भविष्य सुरक्षित असावं असा विचार नक्कीच करते. मात्र या सगळ्या पारंपरिक विचारांना फाटा देत मी पैलवान नवरा निवडला आहे. २०१३ साली उज्जैन येथे झालेल्या स्कूल नॅशनल स्पर्धेत पहिल्यांदा पै. मंगेश कोळी याच्याशी माझी भेट झाली. मी मूळची अहिल्यानगर येथील श्रीगोंद्याची, तर मंगेश मूळचा पुण्यातील कात्रजचा दोघही वेगळ्या जिल्ह्यातील असल्याने आम्ही नॅशनलच्याच माध्यमातून वर्षातून एकदाच भेटायचो. असे एक दोन वर्ष गेले चांगले मित्र झालो. कुस्तीमधील खेळाच्या टेक्निक, आहाराविषयी अशा विविध चर्चा करत होतो. या चर्चांच्या माध्यमातून आमची मैत्री आणखीन घट्ट झाली आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. २०१३ पासून २०२२ पर्यंत एकमेकांना समजून घेत एकत्र येण्याचा विचार केला आणि २०२२ साली लग्न गाठ बांधली.
तर पैलवान मुलाला पैलवान मुलगीच मिळणे यासाठी चांगले नशीबचं लागते. दोघांचेही क्षेत्र एकचं असल्यामुळे विचार जुळले आहेत. भाग्यश्रीने आतापर्यंत तीन वेळा महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील महिला पैलवानांसाठी एक आदर्श कुस्तीगीर, आंतरराष्ट्रीय पदक विजेती, ऑलिम्पिक वीर पैलवान खाशाबा जाधव राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेती असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. उज्जैनपासून सुरू झालेला आमचा प्रवास आहे. प्रेमात अनेक जण सगळं विसरतात मात्र आम्ही दोघांनीही कधीही कुस्तीत प्रेम आणलं नाही. प्रेमाच्या आखाड्यात दोघांनीही कुस्ती जपली असल्याचे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू पै. मंगेश कोळी सांगतात.