पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत असतानाच पुणेकरांची काळजी वाढवणारी माहिती समोर आली आहे. मे अखेरीस पुण्यात तब्बल ९ हजार ६०० पॉझिटिव्ह रुग्ण होतील अशी शक्यता पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी वर्तविली आहे. तर पालिकेच्या विलगीकरण कक्षांमध्ये तब्बल ११ हजार निगेटिव्ह नागरिक विलगिकरणात असतील असेही त्यांनी सांगितले. शहरातील कोरोनाबधितांचा आकडा २१०० च्या पुढे गेला आहे. आगामी दिवसात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. येत्या ११ दिवसात हा आकडा ४ हजार ४०० होण्याची शक्यता असून पुढील ११ दिवसात हा आकडा ८ हजार ८०० एवढा होणार आहे. तर, ३१ मे रोजीपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा ९ हजार ६०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर, १० ते ११ हजार निगेटिव्ह नागरिक विलगिकरणात असणार आहेत. त्यामुळे दोन्हींचा एकत्रित आकडा २० हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, लॉकडाऊन लवकर संपणार नाही. बालेवाडी येथे१० हजार बेड्सची व्यवस्था करण्याचे काम सुरू असून शहरात २० ते २५ हजार बेड्सची रुग्णालयाप्रमाणे तयारी करावयाची आहे. पूर्वीसारखी दुकानेही उघडी ठेवता येणार नाहीत. आपल्याला जीवनपद्धती बदलावी लागणार असून प्रत्येक नागरिकाला मास्क व सॅनिटायझर बंधनकारक करावे लागणार आहे. दुकानांमधील फ्लोरिंग चार चार वेळा सॅनिटायझने साफ करावे लागणार आहे. दरवाजाजवळ वॉशिंगची व्यवस्था करावी लागणार आहे. हे अशा पद्धतीने वर्षभर चालणार असल्याचे गायकवाड म्हणाले.
चिंताजनक! पुण्यात मे अखेरपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या असणार १० हजार : आयुक्त शेखर गायकवाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 22:16 IST
१० ते ११ हजार नागरिक असतील विलगीकरणात
चिंताजनक! पुण्यात मे अखेरपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या असणार १० हजार : आयुक्त शेखर गायकवाड
ठळक मुद्देआजमितीला शहरातील कोरोनाबधितांचा आकडा २१०० च्या पुढे बालेवाडी येथे१० हजार बेड्सची व्यवस्था करण्याचे काम सुरू