‘विश्व संमेलन’ लाडके अन् ‘अखिल भारतीय’ मात्र दोडके..!
By श्रीकिशन काळे | Updated: January 23, 2025 18:28 IST2025-01-23T18:26:52+5:302025-01-23T18:28:40+5:30
मराठी संमेलनासाठी दुजाभाव का ?, अनिवासी भारतीयांचा अनुदानाला नकार

‘विश्व संमेलन’ लाडके अन् ‘अखिल भारतीय’ मात्र दोडके..!
पुणे : एकीकडे दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील महिन्यात होत आहे, त्याला रेल्वेसाठी तिप्पट दर आकारला आहे. तर दुसरीकडे मात्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे होऊ घातलेल्या तिसऱ्या विश्व मराठी संमेलनासाठी परदेशातून येणाऱ्या मराठी व्यक्तींना ७५ हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. सरकारकडून असा दुजाभाव का केला जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. सरकारचे अनुदान परदेशी मराठी लोकांनी स्वीकारू नये, असे आवाहन कॅलिफोर्नियामधील मराठी भाषक अभय पाटील यांनी केले.
दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाणाऱ्यांसाठी रेल्वे तिकिटातही सूट देण्यात आलेली नसताना ‘विश्व मराठी संमेलना’साठी परदेशातून येणाऱ्या अनिवासी मराठीजनांना तब्बल ७५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. दोन्ही संमेलनांचे स्वतंत्र उद्देश असले, तरी मराठी हा समान धागा असताना सरकारी पातळीवरील या विरोधाभासाची साहित्य वर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे, अमेरिकेतीलच मराठीजनांनी करदात्यांच्या पैशांतून मिळणारे हे अनुदान नाकारण्याची भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने पुण्यात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान विश्व मराठी संमेलन घेण्यात येत आहे. त्यासाठी परदेशी मराठी लोकांना आमंत्रण दिले आहे. तसेच संमेलनाला येणाऱ्या परदेशी मराठी लोकांना प्रवास खर्चापोटी प्रत्येकी ७५ हजार रुपये अनुदान महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणार आहे. खरंतर परदेशी व्यक्तींना सरकारकडे अनुदान देण्याची मागणी केली नव्हती. तरी देखील सरकारकडून अनुदान जाहीर केले.
-----------------------------
‘विश्व मराठी संमेलनांसाठी कोणीही अनुदानाची मागणी केली नव्हती. तरी राज्य सरकार प्रत्येकी ७५ हजार रुपये देते. पण परदेशातील काही मंडळी दर वर्षी ते पैसे घेत नाहीत. स्वीकारू नये असेही आवाहन करतात. तरी देखील महाराष्ट्र सरकार ते पैसे देतच राहते. दुसरीकडे, मात्र दिल्लीतील संमेलनासाठी केंद्र सरकार रेल्वे प्रवासात सवलत द्यायला तयार नाही. असा दुजाभाव सरकारच्या प्रतिमेला बाधा आणणारा आहे. - श्रीपाद भालचंद्र जोशी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष
...म्हणून अनुदान देतो !
काही दिवसांपूर्वी पुण्यात मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते की, परदेशातील व्यक्ती विश्व संमेलनाला येतात. ते महाराष्ट्राचेच असतात. त्यामुळे त्यांनी या संमेलनात सहभागी व्हावे, म्हणून त्यांना अनुदान दिले जाते.’’
अनुदान घेऊ नका !
महाराष्ट्र सरकार विश्व संमेलनाला येणाऱ्यांना अनुदान देणार आहे. पण ते घेऊ नये असे आवाहन कॅलिफोर्नियामधील मराठी भाषक अभय पाटील यांनी केले. पाटील यांच्या पत्राची बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद पानवलकर यांनी देखील दखल घेतली. त्यांनी पाठिंबा दिला. ती रक्कम इतर चांगल्या कामासाठी द्यावी, असेही त्यांनी सूचवले.