तेवीस कोटींच्या वाघोली वाढीव पाणीपुरवठा योजनेचे रखडले काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:24 IST2025-10-31T15:18:59+5:302025-10-31T15:24:42+5:30
- ठेकेदाराचा आडमुठेपणा, महापालिका अधिकाऱ्यांची निष्क्रियता; पाण्याविना वाघोलीकरांचे हाल

तेवीस कोटींच्या वाघोली वाढीव पाणीपुरवठा योजनेचे रखडले काम
वाघोली : मागील सहा वर्षांपासून वाघोलीची वाढीव पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे. यासाठी २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. फक्त भिजलेले रोहित्र बसविणे बाकी आहे. मात्र, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे काम पुढे जात नाही. अधिकारी बघ्याच्या भूमिकेत असल्याने वाघोलीकरांना पाण्याच्या समस्येशी तोंड द्यावे लागत आहे.
पीएमआरडीए अंतर्गत २०१९ मध्ये वाघोलीची वाढीव पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेशी संबंधित पाच दशलक्ष लिटर क्षमता असणाऱ्या योजनेसाठी २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वाघोली-आव्हाळवाडी भागासाठी पिण्याचे पाणी वढू खुर्द येथील बंधाऱ्यामधून आणले जाणार आहे.
या योजनेचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे; मात्र सहा वर्षांपासून शिल्लक १० टक्के काम पूर्ण झालेले नाही. वढू येथील जॉकवेलजवळील बंधाऱ्यावर विजेचे रोहित्र बसविण्याचे काम आणि काही किरकोळ काम बाकी आहे. मात्र, असे काम एक वर्षापासूनही पूर्ण झालेले नाही. रोहित्र बसवल्यानंतर चाचणी करून वाघोलीकरांसाठी पाणीपुरवठा सुरू केला जाईल. ठेकेदार काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे पीएमआरडीएने त्याला दंडही ठोठावला आहे.
तरीही ठेकेदार सतत अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे अधिकारी सांगतात. ठेकेदाराने 'जोपर्यंत दंडाची रक्कम रद्द केली जात नाही तोपर्यंत काम करणार नाही' अशी आडमुठेपणाची भूमिका घेतली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या वाघोलीत पूर्वीच्या पाणीपुरवठा योजनेतून काही भागाला पाणी मिळते. मात्र, सोसायटींना वर्षाला लाखो रुपये खर्च करून टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. या सगळ्या प्रकारांमुळे वाघोलीकर आणि सोसायटीतील नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाला आहे. याच्या विरोधात वाघोलीतील नागरिकांनी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. वाघोलीकरांकडून अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे विजय जाचक म्हणाले.
कामाच्या भिंतींना भेगा
जलशुद्धीकरण परिसराची दुरवस्था झाली असून या केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडी, झुडपे वाढली आहेत. या ठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. योजनेचा माहिती फलक गायब आहे. कामाच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत.
नागरिक काय म्हणतात ?
काम पूर्ण करून घेणे हे पीएमआरडीएची जबाबदारी आहे. मात्र सहा वर्षे झाली तरी काम पूर्ण होत नाही. अधिकारी आणि ठेकेदार यांची अनास्था किती वाटते! महिनाभरात काम झाले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा स्थानिक रहिवाशी प्रकाश जमधडे यांनी दिला. आम्ही १५ वर्षापासून वाघोलीत राहतो. तेव्हापासून पाण्याशिवाय हाल होतात. वर्षाला लाखो रुपये टँकरवर खर्च करतो. पालिकेचा कर चुकत नाही. याचे दोषी अधिकारी का? की ठेकेदार? असा प्रश्न सुधीर बेंद्रे यांनी केला. प्रदीप सातव म्हणतात, शासन एवढे उदासीन का आहे? एक प्रकल्प वेळेत पूर्ण करू शकत नाही? कर भरणाऱ्याला वर्षाला लाखो रुपये पाण्यावर का खर्च करावे लागतात? हे काम पूर्ण न होणे यासाठी अधिकारी जबाबदार आहेत.
वढू खुर्द येथील बंधाऱ्यावर रोहित्र बसविण्याचे काम बाकी असून ते लवकर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच योजना सुरू केली जाईल.- विवेक विसपुते, उपअभियंता, पीएमआरडीए