Pune Metro: शिवाजीनगर हिंजवटी मेट्रो स्थानकांचे काम प्रगतीपथावर; आय टी हबमध्ये काम करणाऱ्या लाखोंना फायदा
By राजू इनामदार | Updated: December 16, 2024 19:03 IST2024-12-16T19:02:19+5:302024-12-16T19:03:04+5:30
शिवाजीनगरपासून थेट हिंजवडीपर्यंत जाणाऱ्या या मार्गात एकूण २३ स्थानके असणार

Pune Metro: शिवाजीनगर हिंजवटी मेट्रो स्थानकांचे काम प्रगतीपथावर; आय टी हबमध्ये काम करणाऱ्या लाखोंना फायदा
पुणे: शिवाजीनगर हिंजवडी या शहरातील तीसऱ्या मेट्रो मार्गाच्या स्थानकांचे काम प्रगतीपथावर आहे. एकूण २३ किलोमीटर अंतराचे मेट्रो मार्गाचे काम पुर्णत्वाकडे आले आहे. आता स्थानकांच्या कामाला सुरूवात झाली आहे. या मेट्रोमुळे हिंजवडी आय टी हबमध्ये काम करणाऱ्या काही लाख कर्मचाऱ्यांचा रस्त्यावरून प्रवास करताना होणारा त्रास वाचणार आहे, त्याचबरोबर त्यांनी मेट्रोचा वापर केल्याने या सातत्याने वाहतूक कोंडी होत असलेल्या रस्त्यावरील वाहतूकीचा ताणही कमी होणार आहे.
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर या मेट्रो मार्गाचे काम होत आहे. टाटा कंपनी समुहाने अशा प्रकारच्या कामांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र कंपनीने हे काम घेतले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर सलग ३५ वर्षे या मेट्रोचे संचलन त्यांच्याकडेच असणार आहे. यातून शहराला सार्वजनिक प्रवासी सेवेसाठी वेळ वाचवणारा, स्वस्त व आरामदायी पर्याय मिळणार आहे. शिवाजीनगरपासून थेट हिंजवडीपर्यंत जाणाऱ्या या मार्गात एकूण २३ स्थानके असतील. ती सर्व स्थानके उन्नत म्हणजे रस्त्यापासून साधारण २७ ते २८ मीटर उंचीवर असतील. या स्थानकांच्या कामांना कंपनीने आता वेगात सुरूवात केली आहे.
पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या नियंत्रणाखाली हे काम सुरू आहे. पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड ही विशेष कंपनी (एसपीव्ही- स्पेशल पर्पज व्हेईकल) यासाठी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून मेट्रो मार्गाच्या संपूर्ण कामाचे संचलन केले जात आहे. पुढील वर्षाच्या ( सन २०२५) प्रकल्प पूर्ण होऊन लोकसेवेत रुजू होईल अशी पीएमआरडीए कार्यालयातून देण्यात आली.