अहो आश्चर्यम् ! कोंबड्यांनी अंडी देणे केले बंद म्हणून थेट पोलिस स्टेशनच गाठले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 03:50 PM2021-04-20T15:50:39+5:302021-04-20T19:02:35+5:30

भेसळयुक्त खाद्य दिले म्हणून कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्याचा आरोप...

Wonderful ! As the hens stopped laying eggs in Pune, they reached the police station directly | अहो आश्चर्यम् ! कोंबड्यांनी अंडी देणे केले बंद म्हणून थेट पोलिस स्टेशनच गाठले

अहो आश्चर्यम् ! कोंबड्यांनी अंडी देणे केले बंद म्हणून थेट पोलिस स्टेशनच गाठले

googlenewsNext

लोणी काळभोर : आपल्या कानावर सतत आश्चर्यकारक घटना येत असतात.पण चक्क कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्याने २७ जणांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची अजब घटना पुण्यात घडली आहे. 
या घटनेने सुरुवातीला पोलीस देखील चक्रावून गेले.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात  कंपनीने दिलेले भेसळयुक्त खाद्य कोंबड्यांना दिल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला असून त्यामुळे त्यांनी अंडी देण्याचे बंद केले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. याचा सखोल तपास करून न्याय मिळवून द्यावा असा तक्रार अर्ज २७ जणांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिला आहे. 

 याप्रकरणी लक्ष्मण मुकुंद भोंडवे ( रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली ) यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्यांचेसमवेत या अर्जावर गिरीष दिगंबर चंद, अनिल जवळकर, गोरख विचारे, विनोद दत्तात्रय भोंडवे व धनंजय नारायण डांगे यांचेसह २७ स्वाक्षरी केली आहे. वरिल सर्वांनी ११ एप्रिल रोजी जाफा कॅमफिड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. ( प्लॉट नंबर ए - ११, एमआयडीसी, सुपा पारनेर ग्रोथ सेंटर, अहमदनगर ) या कंपनी कडून खाद्य घेतले होते. ते कोंबड्यांना दिले असता त्यांचे शरीरावर विपरीत परिणाम झाला. परिणामी त्यांनी अंडी देणे बंद केले आहे. यामुळे सर्वाचे मोठे नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात आलेनंतर याबाबत कंपनीस कळवले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून तक्रार अर्ज देण्यात आला आहे. 
 
यासंदर्भात सविस्तर माहिती देताना लक्ष्मण भोंडवे म्हणाले की, अंडी देणाऱ्या कोंबड्यांना १०५ दिवसांनंतर सदर खाद्य दिले जाते. त्यानंतर २१ दिवसांनी कोंबड्या अंडी देण्यास सुरुवात करतात. यापूर्वी याच कंपनीचे खाद्य दिले होते. त्यावेळी कोंबड्या अंडी देत होत्या. परंतू ११ एप्रिल रोजी खरेदी केलेल्या कोंबड्यांना खाद्य दिल्यानंतर ३ दिवसांनी सुमारे १ लाखांपेक्षा जास्त कोंबड्यांनी अंडी देणे बंद केले आहे. इतर वेळी उन्हाळ्यात अंडी कमी दरात खपतात. परंतू, सध्या कोरोनाच्या महामारीमुळे होलसेल भावात ५ रूपये २० पैसे प्रतिअंड्याला भाव मिळत आहे. सद्य दराचा विचार केला तर आमचे जवळपास कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

हवेली तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय केला जातो. तालुक्यातील सर्व पोल्ट्रीचा विचार केला तर हा नुकसानीचा आकडा अब्जावधीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी याप्रकरणी तक्रार अर्ज घेण्यात आला आहे. कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या खाद्याचे नमुने तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. याचबरोबर नुकसान भरपाईसाठी कंपनी प्रशासनाशी बोलणार असून त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Wonderful ! As the hens stopped laying eggs in Pune, they reached the police station directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.