रक्ताच्या थारोळ्यात आढळला महिलेचा मृतदेह, धनकवडी परिसरात एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 15:42 IST2021-05-22T15:31:17+5:302021-05-22T15:42:33+5:30
पुणे शहरात लॉकडाऊन असताना देखील एका सराईत गुन्हेगारासह एकाच आठवड्यात खुनाच्या घटना घडल्या आहेत.

रक्ताच्या थारोळ्यात आढळला महिलेचा मृतदेह, धनकवडी परिसरात एकच खळबळ
धनकवडी : शहरासह उपनगरांमधील खुनाचे सत्र सुरुच असून धनकवडी भागात एका महिलेचा घरात शिरुन निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेजारी राहणारी व्यक्ती सकाळी चार्जर मागण्यासाठी घरात गेली असता ती महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. हा खुनाचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
कल्पना घोष असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना घोष धनकवडी येथील सर्वे नंबर ३/१७ गोविंदराव पाटील नगर येथे मागील सात - आठ महिन्यापासून राहत होत्या. त्या मुळच्या बंगाली असून एकट्याच राहत होत्या. हे घर रमेश शेलार यांचे असून पोलीस त्यांच्याकडून ही माहिती घेत आहेत.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहकारनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या सह पोलीस पथक दाखल झाले आहे.
एका सराईत गुन्हेगारासह उपनगरात तीन खूनासह शहरात मागील आठवड्यात आठ खूनाच्या घटना घडल्या आहेत. शहरात कडक लॉकडाऊनसह संचारबंदी असल्याने पोलीस रस्त्यावर असले तरी गंभीर गुन्ह्यांचे प्रकार कमी झालेले नाही. त्यात पुन्हा एकदा खुनाची घटना उघडकीस आली आहे.