Women's 'bald' is unacceptable to society: Ketaki Jani | बाईचे  ‘टक्कल’ समाजाला न पचणारे : केतकी जानी 
बाईचे  ‘टक्कल’ समाजाला न पचणारे : केतकी जानी 

ठळक मुद्दे२०११ सालापर्यंत सर्वसामान्य महिलेसारखे असलेले त्यांचे बदलले अचानक आयुष्य टक्कलग्रस्त व्यक्तींच्या कथा आणि व्यथा मांडणारे बाला आणि उजडे चमन हे दोन सिनेमे प्रदर्शित

लक्ष्मण मोरे -  

पुणे : ‘अ‍ॅलोपेशिया’मुळे डोक्यावरचे केस गळू लागले... दिवसागणिक टक्कल पडू लागले... लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलू लागला... मित्र-नातेवाईक दूर जावू लागले... हळूहळू नैराश्य येऊ लागले... एक दिवस आत्महत्या करण्यासाठी फास उचलला... मुलांचा चेहरा आठवला अन विचार बदलला... एका क्षणाच्या मृत्यूमधून नव्या आयुष्याची उमेद जन्माला आली अन सुरु झाला यशाच्या शिखराकडे जाणारा प्रवास... 
  ‘बालभारती’ या शासकीय पाठ्यपुस्तक निर्मिती विभागात गुजराती विभागाच्या विशेषाधिकारी म्हणून काम करणाऱ्या केतकी नितेश जानी यांची ही गोष्ट. मुळच्या गुजरातच्या असलेल्या केतकी या लग्न झाल्यावर पुण्यात आल्या. नोकरीच्या शोधात असतानाच वर्तमान पत्रातील जाहिरात वाचून १९९७ साली मुलाखतीसाठी गेल्यावर बालभारतीमध्ये त्यांची लगेचच निवड झाली. नोकरी आणि संसार उत्तम प्रकारे चाललेला असतानाच त्यांना २०११ साली पहिला धक्का बसला. ऑफिसमध्ये त्यांना डोके खाजवत असल्याचे जाणवले. त्यांनी हात लावून पाहताच केसांचा एक पुंजकाच निघाला. थेट त्वचाच दिसायला लागली. तेव्हापासून दिवसागणिक केस गळायला सुरुवात झाली. विविध डॉक्टर्स, विविध उपाय आणि औषधोपचार करुन झाले. परंतू, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. केतकी यांच्या डोक्यावरील केस २०१५ सालापर्यंत पूर्णपणे जाऊन उरले होते ते केवळ टक्कल.
२०११ सालापर्यंत सर्वसामान्य महिलेसारखे असलेले त्यांचे आयुष्य अचानक बदलले. त्यांना मित्र आणि नातेवाईकांनी दूर सारले. टकली बाई म्हणून त्यांना हिणवले जाऊ लागले. लोकांच्या नजरेत सहानुभूती आणि प्रश्नचिन्ह दिसत होते. लोकांसमोर जायला भिती वाटू लागली नाही. आत्मविश्वास कमी होऊ लागला होता. हिला भूतबाधा झाली आहे... देवाचा प्रकोप झाला आहे अशा वावड्या उठल्या. दररोज स्वत:सोबत सुरु असलेला भावनिक संघर्ष समाजासोबतही करावा लागत होता. या काळात त्यांना नैराश्याने वेढले. एक दिवस त्यांनी ओढणी हातात घेऊन गळफास घेण्याचा प्रयत्न केला. फास घेण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांना मुलांचा चेहरा दिसला. आईचं काळीज उचंबळून आलं. मी मरुन जाईन पण उद्याची सकाळ माझ्या मुलांसाठी कशी असेल असा विचार डोक्यात आला.
आत्महत्येचा विचार मनात आला त्याच क्षणी आपला मृत्यू झाला. आता आपण नव्या उमेदीने जगूया; आपला नवा जन्म झाला असे मनाशी ठरवून पूर्ण रात्र जागून काढलेल्या केतकी यांनी त्या क्षणापासून नैराश्य झटकून कामाला सुरुवात केली. त्यांना मानसिक आधार देत उभे राहण्याकरिता त्यांची मुले पुण्यजा आणि पुंज या दोघांनी मदत केली. केतकी यांनी आपले टक्कल अभिमानाने मिरविण्यास सुरुवात केली. डोक्यावर आकर्षक असा टॅटू रंगवून घेतला. सौंदर्याची परिभाषा त्यांनी स्वत:पुरती बदलली. मात्र, सौंदर्याची परिभाषा ठरविणाऱ्या फॅशन जगतात जाण्याचा निर्णय घेतला. ’मिसेस इंडीया वर्ल्ड वाईड’ स्पर्धेसाठी त्यांनी अर्ज भरला. त्यामध्ये केसांसंबंधीच्या रकाण्यात  ‘नो हेअर’ असे नमूद केले. त्यांना अनपेक्षितपणे दुसºयाच दिवशी स्पर्धेमध्ये निवड झाल्याचे कळविण्यात आले. 
मुख्य परिक्षक असलेल्या अभिनेत्री झीनत अमान यांनी त्यांचे कौतूक केले. या स्पर्धेत त्यांना  ‘मिसेस इन्स्पिरेशन’ पुरस्कार मिळाला. त्यांनी आतापर्यंत शेकडो फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केले आहे. अनेक शो मध्ये त्यांना प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावले जाऊ लागले.त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढू लागला. केतकी या आता अ‍ॅलोपेशियाग्रस्त लोकांसाठी काम करीत आहेत.
 ====
टक्कलग्रस्त व्यक्तींच्या कथा आणि व्यथा मांडणारे बाला आणि उजडे चमन हे दोन सिनेमे नुकतेच येऊन गेले. गेल्या दोन-तीन वर्षात देशभरात केस गळाल्याने तीन ते चार तरुणींनी आत्महत्या केल्याची उदाहरणेही समोर आली आहेत. एकीकडे केसांच्या नसण्यामुळे नैराश्यामधून आत्मघाताच्या घटना घडत असतानाच केतकी यांचे सकारात्मक उदाहरण समाजासमोर आले आहे.
====
अ‍ॅलोपेशिया झालेल्या महिलांचे आयुष्य फार दु:खदायी होऊन जाते. घरातील लोक स्विकारत नाहीत. अनेकींचे घटस्फोट झाले आहेत. अनेकींना त्यामुळे खूप मोठा भावनिक आणि केसांना स्त्रीच्या सौंदर्याशी जोडणे थांबले पाहिजे. मी स्वत: भयंकर नैराश्यामधून बाहेर आले आहे. आपलं आयुष्य समाजाचा विचार करुन पणाला लावणे गैर आहे. केस नसले म्हणून काय झाले आपण आपल्या पद्धतीने आणि सन्मानाने जगायला हवे. समाजाची मानसिकता अद्याप आमच्यासारख्यांना स्विकारायला तयार नाही हे त्यांचे दुर्दैव आहे आपले नाही. 
- केतकी नितेश जानी
====
काय आहे अ‍ॅलोपेशिया?
अ‍ॅलोपेशिया म्हणजे डोक्यात चाई पडणे, टक्कल पडणे किंवा केस गळती लागणे. हा आजार झाल्यावर शरीरामध्ये नवीन केस उगविण्याची प्रक्रिया बंद होते. हा आजार अनुवांशिकतेने होऊ शकतो किंवा कोणालाही अचानकपणे उद्भवू शकतो. हा आजार कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो. 

Web Title: Women's 'bald' is unacceptable to society: Ketaki Jani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.