'हिंदू म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांनी दररोज डॉ. आंबेडकरांच्या पायांचे पूजन केले पाहिजे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 19:38 IST2020-02-03T19:35:04+5:302020-02-03T19:38:22+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हिंदू मॅरेज बिल’ याचा आग्रह धरला नसता तर आज हिंदू स्त्रियांचे काय झाले असते, याचा विचारही करवत नाही. त्यामुळे स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या सर्व स्त्रियांनी दररोज डॉ. आंबेडकर यांच्या पायांचे पूजन केले पाहिजे.

'हिंदू म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांनी दररोज डॉ. आंबेडकरांच्या पायांचे पूजन केले पाहिजे'
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हिंदू मॅरेज बिल’ याचा आग्रह धरला नसता तर आज हिंदू स्त्रियांचे काय झाले असते, याचा विचारही करवत नाही. त्यामुळे स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या सर्व स्त्रियांनी दररोज डॉ. आंबेडकर यांच्या पायांचे पूजन केले पाहिजे. तसेच आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यांनी आपल्या अनुयायांना मुस्लिम धर्माची दीक्षा दिली नाही, याचेही सर्व हिंदूंनी आयुष्यभर आभार मानले पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी केले.
स्वा. सावरकर वाङ्मय वक्तृत्व स्पर्धा समितीच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास समितीचे पदाधिकारी सु. ह. जोशी, विद्याधर नारगोलकर, दिलीप पुरोहित, आरती दातार, वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक मिलिंद वेर्लेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी समितीतर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.
गोखले म्हणाले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विज्ञानवाद लोकांना पटत नाही. गाय हा पशू आहे, असे सावरकरांनी सांगितल्याने स्वत:ला हिंदू म्हणवणारा सावरकर यांच्यापासून दूर जातो; ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सावरकरभक्त, सावरकरप्रेमी बनण्यापेक्षा सावरकर विचारप्रेमी व्हावे, सावरकरांचे विचारच कदाचित आपल्या देशाला वाचवू शकतील. तसेच हिंदू आणि हिंदुत्वाची व्याख्या सावरकरांकडून मिळते; ती समजून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. सावरकर आणि आंबेडकर एकत्र आले असते तर आजचा भारत वेगळा दिसला असता. सावरकरांनी कधीही दुसऱ्या धर्माचा द्वेष केला नाही. त्यामुळे संपूर्ण सावरकर समजून घेण्यासाठी कदाचित दुसरा जन्म घ्यावा लागेल.
पुढेा ते म्हणाले की, 'देशातील आदर्शवत असणाऱ्या व्यक्तींना देवत्वाचे स्वरूप दिले जाते. मात्र, त्या व्यक्ती पूर्वी माणूसच होत्या. त्यांच्याकडूनही काही चूक झाल्या असतील. हे कोणीही मान्य करत नाही. देशाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.सावरकरांची हिंदुत्वाची खरी व्याख्या समजून घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मण ही जात नसून पदवी आहे. जो शुद्ध होतो तो बुद्ध होतो. तसेच आमचे श्रीराम मोठे, आमचे कृष्ण मोठे म्हणून आम्ही मोठे, असे म्हणणे चुकीचे आहे. त्यातच कथाकथित राजकारण्यांकडून जातीचे विष पेरले जाते. समाजातून नेहमी एकांगी विचार केला जातो आणि परंपरने दिलेल्या गोष्टी पुढे घेऊन जाण्याकडे लक्ष दिले जाते. परंतु, प्रत्येक गोष्टीचा दुसऱ्याही बाजूने विचार व्हायला हवा., असेही गोखले यांनी या वेळी सांगितले.