महिलांचे रस्त्यावर थांबून अश्लील हावभाव; नवले पूल परिसरात पुन्हा देहविक्रय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 12:53 IST2025-01-05T12:52:40+5:302025-01-05T12:53:03+5:30
सिंहगड रस्ता पोलिसांनी २ महिन्यांपूर्वी येथे कारवाई केली, त्यानंतर या भागात देहविक्रय करणाऱ्या महिलांनी थांबणे बंद केले होते

महिलांचे रस्त्यावर थांबून अश्लील हावभाव; नवले पूल परिसरात पुन्हा देहविक्रय
पुणे: मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील नवले पूल परिसरात देहविक्रय करणाऱ्या चार महिलांविरुद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतुकीस अडथळा व अश्लील हावभाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
सिंहगड रस्त्यावरील नवले पूल परिसरात गेल्या काही महिन्यांपासून काही महिला रस्त्यावर थांबून देहविक्रय व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. या भागातील रहिवाशांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी देहविक्रय करणाऱ्या आठ महिलांविरुद्ध कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या महिला रस्त्यावर थांबून अश्लील हावभाव करतात. त्यामुळे या भागातील महिला आणि युवतींना त्रास होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.
नवले पुलाशेजारी असलेल्या सेवा रस्त्यावर या महिला थांबतात. सिंहगड रस्ता पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी येथे कारवाई केली. त्यानंतर या भागात देहविक्रय करणाऱ्या महिलांनी थांबणे बंद केले होते. त्यानंतर या भागात पुन्हा देहविक्रय करणाऱ्या महिला थांबून अश्लील हावभाव करीत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाये तपास करीत आहेत.