रस्ते, पाणी, कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त; आयुक्तांच्या गाडीसमोर लोटांगण आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 00:43 IST2025-10-17T00:42:59+5:302025-10-17T00:43:49+5:30
Lohegaon Protest: रस्ते, पाणी, कचऱ्याच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आयुक्तांच्या गाडीसमोर लोटांगण आंदोलन केले.

रस्ते, पाणी, कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त; आयुक्तांच्या गाडीसमोर लोटांगण आंदोलन
लोहगाव: कळस धानोरी लोहगाव येथील नागरी प्रश्नांच्या संदर्भात वारंवार निवेदन देवूनही प्रश्न सुटत नसल्याने, पुजा धनंजय जाधव यांच्या वतीने पुणे मनपा चे आयुक्त नवलकिशोर राम यांच्या गाडीच्या समोर लोटांगण आंदोलन करण्यात आले.
पुणे महानगरपालिकेने २००८ साली बनविलेल्या डीपी प्लॅन नुसार आखण्यात आलेल्या रस्त्यांची कामे १५ वर्षां नंतरही पुर्ण झालेली नाहीत. त्यामुळे तात्काळ डीपी रस्त्यांची अपुर्ण कामे पुर्ण करून, डीपी रस्ते चालू करण्यात यावे. कळस, धानोरी, लोहगाव मधील मुख्य रस्ता व सिमेंट रस्ता वगळता, उर्वरित सर्वच रस्त्यांची चाळण झालेली आहे. निवेदने दिल्यानंतर डागडुजी करण्यात येते परंतु त्यामुळे अधिकच समस्या वाढत असून, रस्त्यांवर खड्डे वाढत चालले आहेत. परिणामी पावसाळ्यात यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असून, दररोज किमान १०० ठिकाणी कचरा साचत आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. साठे वस्ती, निंबाळकर नगर, मोझे नगर, पोरवाल रोड या भागामध्ये पिण्याचे पाणी २ दिवसांआड येते. पाण्याची लाईन टाकून झालेली असताना सुद्धा पाणी सोडले जात नाही. त्यामुळे पाण्याची समस्या वाढत आहे.
डी वाय पाटील रस्ता ते लोहगाव रस्त्या खोदण्यात आला होता परंतु महिनोमहिने झाले तरी काम पुर्ण होताना दिसत नाही. त्यामुळे तात्काळ कामे पुर्ण करून रस्ता तयार करण्यात यावा. प्रभागात अनेक ठिकाणी अंतर्गत रस्ते तयार करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रस्ते तयार करण्यात यावेत. मयूर किलबिल मधील नागरिकांच्या जीवाशी विकासक खेळत असूनही, त्याबाबतीत प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही.