पुण्यात वकील महिलेचा विनयभंग करून खंडणीची मागणी; पोलिसांनी केले दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 08:00 IST2022-08-08T07:59:07+5:302022-08-08T08:00:42+5:30

फेसबुक व युट्यूब चॅनेलच्या माध्यमातूनही त्यांची बदनामी केली....

Woman lawyer molested and demanded extortion Police ignored pune crime | पुण्यात वकील महिलेचा विनयभंग करून खंडणीची मागणी; पोलिसांनी केले दुर्लक्ष

पुण्यात वकील महिलेचा विनयभंग करून खंडणीची मागणी; पोलिसांनी केले दुर्लक्ष

पुणे : वकीलपत्र सोडण्यासाठी दबाव टाकून महिला वकिलाचा विनयभंग करीत खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयाने कोंढवा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. कॅन्टोन्मेंट न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एन. ओंडारे यांनी हा आदेश दिला आहे.

त्यानुसार वसीम इकबाल खान (वय ३५), नदीम सय्यद (वय ३५), भरत जाधव (वय ५८) आणि अतीका नदीम सय्यद (वय ३२, सर्व रा. सनशाईन हिल्स, पिसोळी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत एका तक्रारदार वकील महिलेने न्यायालयात ॲड. साजिद शाह, ॲड. अमित मोरे यांच्यामार्फत खासगी तक्रार दाखल केली होती.

ॲड. शाह यांनी सांगितले की, तक्रारदार महिला ही वकील असून सोसायटीमधील गैरव्यवहारात सहभागी असलेल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी सोसायटीतील नागरिकांनी तक्रारदार महिलेची कायदेशीर सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. हे संशयित आरोपींना समजल्यानंतर त्यांनी तक्रारदारावर व त्यांच्या परिवाराला मानसिक, शारीरिक त्रास देत कायदेशीर मदत न करण्याची धमकी दिली. परंतु आरोपींच्या दबावाला त्या बळी पडल्या नाहीत. त्यांच्यावर पाळतही ठेवली जात असल्याने त्यांनी याबाबत संशयितांना विचारणा केली. त्यावेळी यातील एकाने मी एका टोळीचा सदस्य असल्याचे सांगत ही केस सोडण्याची व तिचे अपहरण करण्याची धमकी दिली. कोंढवा पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. त्यानंतर १६ जानेवारीला आरोपींपैकी एकाने अपमानजनक व अश्लील शब्द वापरून फिर्यादीचा विनयभंग केला. तसेच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचेही न्यायालयीन तक्रारीत म्हटले होते.

पोलिसांनी केले दुर्लक्ष

फेसबुक व युट्यूब चॅनेलच्या माध्यमातूनही त्यांची बदनामी केली. तसेच त्यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही तोडून टाकले, दरवाजा तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या घराच्या भिंतीवर पत्र चिकटवून ३० हजारांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करताना पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतल्याचे म्हटले. त्यावर न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना दिले आहेत.

Web Title: Woman lawyer molested and demanded extortion Police ignored pune crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.