गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे भासवून महिलेला साडेसहा लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Updated: January 7, 2024 16:56 IST2024-01-07T16:56:01+5:302024-01-07T16:56:11+5:30
खासगी माहितीचा वापर करून महिलेच्या बँक खात्यातून ६ लाख ५० हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले

गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे भासवून महिलेला साडेसहा लाखांचा गंडा
पुणे : गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे भासवून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार येरवडा परिसरात घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी शनिवारी (दि. ६) अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार भारत गॅस एजन्सीला संपर्क करण्यासाठी महिलेने कस्टमर केअर नंबर गुगलवर शोधला. एका पेजवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केल्यावर आम्ही भारत गॅस एजेन्सीमधून बोलत आहोत असे सांगितले. महिलेने तक्रार नोंदवण्यासाठी फोन केल्याचे सांगितल्यावर तुमची अडचण दूर करण्यासाठी एक लिंक पाठवत आहोत. त्यावर क्लिक करून अप्लिकेशन डाउनलोड करा असे सांगितले. महिलेने अप्लिकेशन डाउनलोड केल्यावर त्यांच्या मोबाईलचा संपूर्ण ऍक्सेस मिळवला. अडचण दूर करण्यासाठी १० रुपये भर असे सांगून महिलेच्या बँक खात्याची खासगी माहिती चोरली. खासगी माहितीचा वापर करून महिलेच्या बँक खात्यातून ६ लाख ५० हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचन जाधव या करत आहेत.