बारामतीत सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, उपचाराला उशीर झाला म्हणून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 19:16 IST2025-05-27T19:15:40+5:302025-05-27T19:16:06+5:30
रुग्णाला वेळेत उपचार दिल्यानंतरही शरीराने उपचारांना साथ न दिल्याने मृत्यू झाल्याचा रुग्णालयाचा दावा

बारामतीत सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, उपचाराला उशीर झाला म्हणून...
बारामती: कऱ्हावागज (ता. बारामती) येथील कांताबाई शंकर नाळे (वय ४७) या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२६) घडली. नाळे यांना उपचारासाठी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, या ठिकाणी वेळेवर उपचार मिळाले नसल्याने कांताबाई यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला.
कांताबाई नाळे यांना सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सर्पदंश झाला. त्यानंतर तत्काळ बारामतीच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु तेथे तत्काळ उपचार मिळाले नाहीत. मुख्य डाॅक्टर ८ वाजता आले. त्यांनी नाळे यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. उपचाराला उशीर झाल्याने कांताबाई यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.
दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात कऱ्हावागज येथील कांताबाई शंकर नाळे या रुग्णाला वेळेत उपचार दिल्यानंतरही रुग्णाचे शरीराने उपचारांना साथ न दिली नाही. त्यामुळे रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजेश उमप यांनी केला आहे. कांताबाई शंकर नाळे यांना रुग्णालयाच्या अपघात विभागामध्ये उपचाराकरिता दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर ६ वाजून ३६ मिनिटांनी आवश्यकतेनुसार उपचार करण्यास सुरुवात केली. रुग्णाला सर्व प्रथम 'सर्पविष प्रतिबंधक लस (अँटी स्नेक वेनोम)' इंजेक्शन दिले. प्राथमिक उपचारानंतर रुग्णाला पुढील उपचाराकरिता सकाळी ७.५० वाजता अतिदक्षता विभागामध्ये स्थलांतरित करण्यात आले. तथापि, वेळेत उपचार होऊनही शेवटी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. उमप यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.