महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 10:36 IST2025-12-23T10:29:33+5:302025-12-23T10:36:04+5:30
Supriya Sule News: राज्यात महापालिका निवडणूक होत असून, या निवडणुकींमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार का? याबद्दल अजूनही साशंकत आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळेंनी मोठं विधान केलं आहे.

महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील इतर महापालिकांमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र राहणार की, आघाडी दुभंगणार याबद्दल अजूनही स्पष्टता आलेली नाही. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. 'काँग्रेस स्वबळावर लढवत असेल, तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू', असे त्या म्हणाल्या आहेत.
माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडी एकत्र लढणार की तिन्ही पक्ष वेगवेगळे लढणार याबद्दलच्या मुद्द्यावर भाष्य केले.
महाविकास आघाडी कायम राहावी असा प्रयत्न
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मुंबईसह राज्यामध्ये सर्व महापालिकांमध्ये भाजपप्रणित महायुतीविरोधामध्ये महाविकास आघाडी कायम राहावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी पक्षाकून काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पण, तरीही काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत असेल, तर इतर पर्यायांचा विचार करण्यात येईल", अशी भूमिका सुळे यांनी मांडली.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि इतर काही ठिकाणी एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याबद्दलही सुप्रिया सुळे भाष्य केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवण्याबद्दल मला काही माहिती नाही, असे त्या म्हणाल्या.
नगरपरिषद, नगरपंचायत निकालाबद्दल नवल नाही
राज्यात झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल लागले. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा पुन्हा मोठा पराभव झाला. या निकालाबद्दलही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले.
खासदार सुळे म्हणाल्या की, "साधारणपणे ज्यांची सत्ता असते, त्यांचाच अशा निवडणुकांमध्ये विजय होतो, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे या निकालांबद्दल काहीही नवल वाटले नाही."
या निकालावरच त्या पुढे म्हणाल्या की, "भाजपकडून १२४ जागांवर विजय मिळवल्याचा दावा केला जात आहे. त्यातील किती मूळ भाजपमधील आहेत. किती बाहेरून आलेल्या नेत्यांच्या जोरावर जिंकल्या आहेत. याचा हिशेब केला तर खरे चित्र दिसेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याने मतांचे विभाजन झाले आणि त्यामुळे भाजपला यश मिळाले", असे मत सुप्रिया सुळेंनी मांडले.