अण्णा भाऊंच्या चित्रपटाला निधी देऊ; फडणवीसांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 10:49 IST2025-08-02T10:48:44+5:302025-08-02T10:49:51+5:30
प्रेरणादायी कार्याला उजाळा देत राज्य शासन त्यांची स्मृती चिरंतन राहील, यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.

अण्णा भाऊंच्या चित्रपटाला निधी देऊ; फडणवीसांची ग्वाही
पुणे : समाजातील दुःख-दैन्याचे प्रतिबिंब आपल्या लेखणीतून दाखवणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित केला जाईल. त्यांच्या प्रेरणादायी कार्याला उजाळा देत राज्य शासन त्यांची स्मृती चिरंतन राहील, यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.
उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य खंड क्रमांक ५, ६ आणि ७ चे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, डॉ. नीलम गो-हे, माधुरी मिसाळ, अमित गोरखे, विजय शिवतारे, सुनील कांबळे, हेमंत रासणे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णा भाऊ हे पहिले दलित बंडखोर लेखक होते, ज्यांनी प्रस्थापित मराठी परंपरेला आव्हान दिले. त्यांनी दलित, स्त्रिया, श्रमिक, भटके यांच्या व्यथा साहित्यातून व्यक्त केल्या. त्यांच्या साहित्यात प्रबोधन आणि परिवर्तनाची ताकद होती. त्यांची स्मृती जपणे आणि त्यांची ऊर्जा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे शासनाचे कर्तव्य असल्याची भावना व्यक्त केली. प्रकाशन सोहळ्यात अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्यांनी साहित्य खंडातील साहित्याचा परिचय करून दिला.
स्मारकासाठी २५ कोटींचा निधी मंजूर
मुख्यमंत्री म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात करुणा, क्रांती, संवेदना आणि काव्य आहे. त्यांच्या रचना आज २२ भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. ते खऱ्या अर्थाने एक चालतेबोलते विद्यापीठ होते. त्यांच्या स्मारकासाठी २५ कोटींचा निधी मंजूर केला असून लवकरच स्मारकाचे काम पूर्ण होईल.