जादूटोण्याच्या संशयावरून पती-पत्नीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 05:24 IST2018-11-09T05:19:32+5:302018-11-09T05:24:11+5:30
औढे ता खेड येथे जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून कातकरी समाजातील पती पत्नीचा झोपेत असताना अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला.

जादूटोण्याच्या संशयावरून पती-पत्नीचा खून
पाईट (पुणे) - औढे ता खेड येथे जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून कातकरी समाजातील पती पत्नीचा झोपेत असताना अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला.
औढे ता. खेड येथील गायमाळ वस्तीजवळील महारदरा परिसरात गवताची झोपडी करून राहत असलेल्या नवसु पुणाजी वाघमारे( वय ५५ वर्षे ) व त्याची पत्नी लीलाबाई सुदाम मुकणे (वय ५० वर्षे ) हे घरी झोपेत असताना रात्री ११ वाजताचे सुमारास अत्यंत निर्घृणपणे लोखंडी हत्याराने त्यांचा खून करण्यात आला. अत्यंत निर्जन ठिकाणी झोपडे बांधून राहत असल्याने याबाबत सकाळपर्यंत काहीच माहिती मिळाली नाही . सकाळी ८ वाजेच्या सुमारास दूध घालण्यासाठी लगबगीने जात असताना मारूती शंकर शिंदे यांना वाघमारे अंथरुणामध्ये रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले निदर्शनास आले तर लीलाबाई औढे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर झोपडीपासून काही अंतरावर निर्वस्त्र मृतावस्थेत निदर्शनास आली. त्यांनी लगेचच निदर्शनास आलेला प्रकार पोलिसांना सांगितला. याबाबत लीलाबाई मुकणे हिच्या मुलाने खेड पोलिसांत फिर्याद दिली असून त्याच्या सांगण्यानुसार नवसु वाघमारे यांच्याबरोबर लीलाबाई मुकणे हिने पहिल्या पतीचे निधन झाल्यावर दुसरा विवाह केला असून ती नाव मात्र पहिल्या पतीचे लावत होती. ती मांत्रिक असल्याचीही गावात चर्चा होती.