जे बोललोच नाही ते माझ्या नावावर खपवता कशाला ? नितीन गडकरींचा माध्यमांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 17:32 IST2018-12-23T17:26:30+5:302018-12-23T17:32:11+5:30
नितीन गडकरी एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले हाेते, त्यावेळी पत्रकारांशी बाेलताना बॅंकीक बाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे ते म्हणाले.

जे बोललोच नाही ते माझ्या नावावर खपवता कशाला ? नितीन गडकरींचा माध्यमांना सवाल
पुणे : बँकेतील व्यवहारामध्ये नफा आणि तोटा या दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागतो. अशातच कधी यश तर कधी अपयश पदरात पडते. या विधानाचा अर्थ आणखी सुलभतेने समजून सांगण्याकरिता निवडणुकीचे उदाहरण दिले. मात्र त्याचा सोयीनुसार विपर्यास करण्यात आला. जे बोललोच नाही ते माझ्या नावावर का खपवता ? असा सवाल केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यमांना विचारला.
एका कार्यक्रमानिमित्त गडकरी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शनिवारी पुण्यात बँकिंग क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमात झालेल्या कार्यक्रमात गडकरी यांनी बँकिंग मधील नफा तोटा संबंधी भाष्य केले. ते करताना निवडणुकीच्या काळातील यश आणि अपयशाचा दाखला त्यांनी दिला. पत्रकार परिषदेत गडकरी यांनी माध्यमांना धारेवर धरत आपण जे बोललो त्याची मोडतोड करून सोयीनुसार का प्रसारित करता असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, जो तो वेगवेगळ्या अजेंड्यानुसार आपली मते दुसऱ्याच्या गळी उतरवले जात आहे. मागील महिन्यापासून असा वेगळा अनुभव आपल्याला येत आहे. आपण केलेलं विधान हे राजकीय नव्हते. त्याचा अर्थ हा बँकिंग च्या संदर्भात होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते.
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही
मी पंतप्रधान होणार याविषयी कोण काय बोलतो, कोण काय लिहितो याकडे जास्त लक्ष देत नाही. आगामी काळातील निवडणुका या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडतील. माझे नाव जरी पंतप्रधान पदाच्या यादीत घेतले जात असले तरी भावी पंतप्रधान मोदीच असतील. असे गडकरी यांनी सांगितले.