उरुळी कांचन: शिंदवणे (ता. हवेली) येथील शेतात नांगरणी करून विहिरीच्या कडेला ट्रॅक्टर उभा केला होता. दरम्यान बहीण-भाव ट्रॅक्टरवर खेळत असताना तो सुरू होऊन विहिरीत पडला. यात दीड वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. तर चार वर्षाचा भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. आदिती मोरे असे मृत्यू चिमुरडीचे नाव आहे, तर आर्यन मोरे असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.
शिंदवणे येथील शेतकरी दत्तात्रय महाडिक हे स्वतःच्या मालकीच्या शेतात ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी करत होते. नांगरणी झाल्याने दत्तात्रय महाडिक यांनी ट्रॅक्टर विहिरीच्या कडेला बंद करून उभा केला होता. यावेळी मुक्तार फॉर्म येथे मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या मजुरांची दोन मुले (भाऊ-बहीण) नकळत ट्रॅक्टरवर जाऊन बसली. ट्रॅक्टर चावीच्या साह्याने चालू केल्याने ट्रॅक्टर विहिरीत पडला. ट्रॅक्टरबरोबर बहीण-भाऊही विहिरीत पडले. ट्रॅक्टर विहिरीत पडल्याचे दिसताच दत्तात्रय महाडिक यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर महाडिक स्वत: विहिरीत उतरले. त्यांनी आदिती आणि आर्यनला बाहेर काढले. पण आदितीचा मृत्यू झाला होता, तर आर्यनला उरुळी कांचन येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतची फिर्याद मुलांची आई जान्हवी सुनील मोरे यांनी पोलिसांत दिली आहे.