वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 23:03 IST2025-12-11T22:55:01+5:302025-12-11T23:03:45+5:30
Vasant More Navale Bridge: पुणे -बंगळूरू महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवले पुलावर सातत्याने होणाऱ्या दुर्घटनांवर शिवसेना (उद्धव ...

वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
Vasant More Navale Bridge:पुणे-बंगळूरू महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवले पुलावर सातत्याने होणाऱ्या दुर्घटनांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते वसंत मोरे हे गुरुवारी फेसबुक लाईव्हद्वारे माहिती देत असतानाच, त्यांच्यावर एक मोठा अपघात ओढवण्याची शक्यता होती. प्रसंगावधान राखल्यामुळे वसंत मोरे आणि त्यांचा कॅमेरामन थोडक्यात बचावले.
फेसबुक लाईव्ह सुरू असताना घडला थरार
नवले पुलाच्या परिसरात वसंत मोरे हे लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून अपघातांची वाढती संख्या, त्याची कारणे आणि अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना याविषयी माहिती देत होते. त्याचवेळी, त्यांच्या दिशेने अत्यंत भरधाव वेगाने एक चारचाकी टेम्पो आला.
वसंत मोरे हे फेसबुक लाईव्हमध्ये नवले पुलावर उपाय योजना करण्यासाठी वेग मर्यादा पाळली पाहिजे, ६० किमीची मर्यादा आहे, त्या ऐवजी ३० किमी करावी, असं सांगत होते.
धोकादायक परिस्थिती लक्षात येताच, वसंत मोरे आणि त्यांच्यासोबत असलेले कॅमेरामन यांनी तातडीने रस्त्याच्या बाजूला धाव घेतली. त्यामुळे ते दोघेही कोणत्याही दुखापतीशिवाय सुरक्षित बचावले. हा संपूर्ण थरार त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये कैद झाला असून, टेम्पोचा वेग किती जास्त होती, हे त्यातून स्पष्ट होते.
परिसरात पुन्हा अपघात
मोरे यांच्यावर बाका प्रसंग ओढवण्यापूर्वी याच नवले पूल परिसरात दोन रिक्षांची धडक झाल्याने अपघात झाला होता. या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, दोन्ही रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे.
एखाद्या राजकारण्याने अपघाताच्या समस्येवर आवाज उठवत असतानाच त्यांना आलेला हा अनुभव, नवले पुलाच्या परिसरातील वाहतुकीची बेफिकिरी आणि अपघातांची शक्यता किती मोठी आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकारामुळे पुणेकरांनी या परिसरातील सुरक्षेच्या मुद्द्यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा उचलून धरली आहे.