When will the citizens of 'those' places in Pune city be resolved? | पुणे शहरातील ‘त्या’पेठांमधल्या नागरिकांचा कोंडमारा केव्हा सुटणार?

पुणे शहरातील ‘त्या’पेठांमधल्या नागरिकांचा कोंडमारा केव्हा सुटणार?

ठळक मुद्देगल्लीबोळ बंदच: सोमवारी निर्णय होण्याची शक्यता

पुणे: शहराच्या बहुतेक भागांची कोरोना टाळेबंदीतून बर्याच प्रमाणात सुटका झाली. मध्यभागातील पेठां व काही परिसर मात्र अजूनही कोंडलेलाच आहे. बांबूवर पत्रे लावून बंद केलेला गल्लीबोळ तसेच रस्तेही बंदच आहेत. नागरिकांना ते कधी खुले होणार याची प्रतीक्षा आहे.
कंटेन्मेट म्हणजे डेंजर झोन (सर्वाधिक कोरोना रूग्ण सापडत असलेला परिसर) जाहीर केल्याने पेठांची अडचण झाली आहे. दत्तवाडीतून पुढे शुक्रवार पेठेकडे जाणारा रस्ता, पर्वतीकडून शिवदर्शन, सहकार नगरकडे जाणारा रस्ता फडगेटपासून गुरूवारपेठेकडे जाणारा रस्ता, गंजपेठेतून पुढे भवानीपेठेत जाणारा रस्ता, त्यापुढे सोन्या मारूती चौकातून रास्तापेठ, गणेश पेठेतून गुळ आळी, कँम्पचा बराच मोठा भाग, वानवडी, लोहियानगर असा फार मोठा परिसर प्रशासनाने पोलिसांच्या साह्याने पत्रे लावून बंद केला आहे. या भागातून जास्त रूग्ण मिळत असल्याने संसर्ग वाढू नये म्हणून महिनाभरापूर्वी ही व्यवस्था करण्यात आली. 
कोरोना लॉकडाऊन मधून पुण्याच्या अन्य बर्याच मोठ्या परिसराला यातून मोकळीक मिळाली आहे. 'पुनश्च: हरिओम' मध्ये तर  तिथे आता दुकानेही सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत खुली असतात. कंटेन्मेट झोनमध्ये मात्र फक्त सकाळी गर्दी असते. बहुसंख्य दूकानदार दूपारी १ वाजता विक्री बंद करून निघून जातात. त्यांच्यापर्यंत यायचे म्हटले तरी नागरिकांना बांबूखालून, पत्रे तिरके करून कसरत करत यायला लागते. भाजीपाला, किराणा सामान घेतानाही हीच स्थिती आहे. या परिसरात महापालिकेचे बरेच कर्मचारी आहेत. खासगी संस्थामधील नोकरदार व पालिका कर्मचार्यांना रोज कामावर जावेच लागते. त्यांनाही जाताना येताना अशीच कसरत करावी लागते. त्यांना राहत्या गल्लीतून बाहेर मुख्य रस्त्याला जाणेच अवघड झाले आहे. त्यांच्यातील अनेकजण आपली वाहने रस्ता बंद केला तिथेच ठेवून पुढे पायी येतात जातात.
आता भवानी पेठ व अन्य काही भागातून कोरोना रूग्ण मिळून येणे कमी झाले आहे. तरीही रस्ते खुले व्हायला तयार नाहीत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकसंख्येचे प्रमाण बरेच आहे. बहुतांश कुटुंबे गरीब हातावर पोट असणारी आहेत. त्याच भागात कोणाकोणाचे बेकरी, सलून, पंक्चर, भाजीपाला, वडापाव, चहानाष्टा अशी दुकाने आहेत. तीही मागील अडीच महिने बंदच आहेत. व्यवसाय बंद असल्याने या वगार्चेही हाल होत आहेत. किमान अन्य ठिकाणांप्रमाणे रस्ते खुले करून व्यवसायाला परवानगी द्यावी अशी त्यांची मागणी आहे. गवरी आळी, नेहरू चौक, गणेश मार्केट अशा लहान भाजी मंडयाही प्रशासनाने अजून बंदच ठेवल्या आहेत. तिथे व्यवसाय करणार्यांनाही आता या लहान मंडया सुरू करून हव्या आहेत. 
-----/
सुरूवातीला या भागात मोठ्या संख्येने रूग्ण सापडत होते, त्यामुळे आम्ही कोणत्याही कारवाईला कधी विरोध केला नाही. पण आता तीन महिने होत आलेत. रूग्ण साडणेही कमी झाले आहे. नागरिकांमध्येही जागरूकता आली आहे. त्यामुळे या भागातही आता मोकळीक देणे गरजेचे आहे. किमान मंडई, पंक्चर, फिटर सारखे काही व्यवसाय सुरू करायला परवानगी द्यावी व मुख्य म्हणजे रस्ते, गल्लीबोळ बंद करावेत. महापौर, प्रशासन यांच्याकडे तशी मागणी केली आहे.
अजित दरेकर, स्थानिक नगरसेवक.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When will the citizens of 'those' places in Pune city be resolved?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.