ओव्हरहेड केबलचे करायचे काय? महापालिकेच्या विद्युत विभागापुढे प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 15:40 IST2024-12-31T15:39:37+5:302024-12-31T15:40:34+5:30
महापालिकेने हाती घेतलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेंतर्गत विद्युत विभागाकडून केबल काढण्याचे काम केले जात आहे

ओव्हरहेड केबलचे करायचे काय? महापालिकेच्या विद्युत विभागापुढे प्रश्न
बाणेर : बाणेर, बालेवाडी परिसरातील रस्त्यांचे पथदिव्यांचे खांब, झाडे आणि इमारतींवर अवैधरीत्या टाकण्यात आलेल्या विविध कंपन्यांच्या ओव्हरहेड केबल महापालिकेच्या विद्युत विभागाकडून कापून जप्त केल्या जातात. मात्र, या केबलचा संबंधित कंपन्या सोडवून नेत नाहीत, त्यांचा उपयोग इतर कोणत्याही कामासाठी होत नाही, त्यामुळे या केबलचे करायचे काय, असा प्रश्न विद्युत विभागापुढे निर्माण झाला आहे.
महापालिकेने हाती घेतलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेंतर्गत विद्युत विभागाकडून केबल काढण्याचे काम केले जात आहे. मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर केबल कापून विद्युत विभागाने जप्त केल्या आहेत. या केबल महापालिकेच्या औंध येथील अतिक्रमण विभागाच्या गोडावूनमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. जप्त केलेला केबल संबंधित कंपन्यांकडून सोडविल्या जात नाही. शिवाय त्यामध्ये तार नसते, त्यामुळे त्यांचा उपयोग इतर कामासाठीही होत नाही. त्यामुळे या केबलचे करायचे काय, असा प्रश्न विद्युत विभागापुढे निर्माण झाला आहे.
अवैध केबल तोडण्याची कारवाई सातत्याने वारंवार करण्यात येते. ज्या भागातील केबलवर कारवाई केली आहे, त्या भागातील इंटरनेट सेवा बंद होते. संबंधित कंपनीकडून पुन्हा नव्याने केबल टाकल्या जातात. कारवाई करून जप्त केलेल्या केबलचा साठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. या केबलचा उपयोग इतर कामांसाठी होत नसल्याने याचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. - दत्ता लाळगे, कनिष्ठ अभियंता स्ट्रीट लाईट, औंध