सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 20:25 IST2025-08-26T20:24:54+5:302025-08-26T20:25:08+5:30

गेल्या ५ दिवसांत गौतम गायकवाडसोबत नेमकं काय झालं, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.

What happened in 'those' 5 days at Sinhagad? Missing Gautam Gaikwad recounts the thrill | सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

मागील पाच दिवसांपासून बेपत्ता असलेला २४ वर्षीय तरुण गौतम गायकवाड अखेर सिंहगडाच्या दरीत जखमी अवस्थेत सापडला अन् त्यांच्या कुटुंबाच्या जिवात जीव आला. मात्र, गेल्या ५ दिवसांत गौतमसोबत नेमकं काय झालं, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. पुण्यातील सिंहगडाच्या तानाजी कड्याजवळ तो पाच दिवसांपासून दरीत अडकून पडला होता. त्याच्या शरीरावर अनेक जखमा असून, सध्या त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गौतमसोबत नेमकं काय घडलं?
हैदराबादहून पुण्यात फिरायला आलेल्या गौतमने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मी मित्रांसोबत सिंहगडावर फिरायला गेलो होतो. त्यावेळी लघुशंकेसाठी मी बाजूला गेलो असता, मला तानाजी कड्याजवळ एका ठिकाणी एक कुत्रा अडकलेला दिसला. त्याला वाचवण्यासाठी खाली उतरत असताना माझा पाय घसरला आणि मी दरीत कोसळलो.'

दरीचा कडा सरळ असल्याने त्याला पुन्हा वर चढता आले नाही. त्याने मदतीसाठी खूप ओरडण्याचा प्रयत्न केला, मात्र जोरदार पाऊस सुरू असल्याने त्याचा आवाज कोणापर्यंतच पोहोचला नाही. त्यामुळे त्याला त्याच अवस्थेत दरीत राहावे लागले, असे गौतम म्हणाला.

पाच दिवस उपाशी आणि जखमी अवस्थेत होता गौतम
दरीमध्ये पडल्यानंतर त्याला एका सुरक्षित ठिकाणी झोप लागली. जाग आल्यावर त्याला काहीच दिसत नव्हते. तो हळूहळू पुढे सरकत गेला. जवळपास पाच दिवस त्याला अन्न किंवा पाणी मिळाले नाही. अखेर पाच दिवसांनी त्याला काही लोकांचा आवाज आला. आवाज येत असलेल्या दिशेने तो स्वतःहून चालत गेला. त्यावेळी त्याला दोन लोक दिसले. त्यांनी त्याला पाहिले आणि मदत केली.

सुरुवातीला गौतमने कर्जाच्या समस्येमुळे बेपत्ता होण्याचा बनाव रचल्याची चर्चा होती. सीसीटीव्ही फुटेजमुळे या संशयाला आणखी बळकटी मिळाली होती. मात्र, गौतमने स्वतः सांगितलेली ही थरारक कहाणी समोर आल्याने हा सगळा प्रकार नेमका काय होता, हे स्पष्ट झाले आहे. पाच दिवसांनी गौतम जिवंत सापडल्याने त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

Web Title: What happened in 'those' 5 days at Sinhagad? Missing Gautam Gaikwad recounts the thrill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.