भोर :काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजपामधील प्रवेशाच्या दृष्टीने आज भोरमध्ये होणाऱ्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, थोपटे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे समजते.
भोर येथील फार्मसी हाॅलमध्ये संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत भोर तालुका काँग्रेस कमिटी, भोर तालुका महिला काँग्रेस कमिटी, भोर तालुका युवक काँग्रेस कमिटी, भोर शहर काँग्रेस कमिटी व सर्व सेलचे अध्यक्ष, सर्व उपाध्यक्ष, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, पुणे जिल्हा परिषद सदस्य, भोर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती, उपसभापती व सदस्य, राजगड सहकारी साखर कारखाना संचालक, भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती सर्व संचालक, भोर तालुका खरेदी- विक्री संघाचे चेअरमन, व्हा. चेअरमन सर्व संचालक, श्रीदत्त दिगंबर वाहतूक संघाचे चेअरमन संचालक भोर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, गावोगावचे सरपंच, उपसरपंचांसमवेत महत्त्वाची बैठक रविवारी (दि.२०) सकाळी ११:०० वाजता अनंतराव थोपटे महाविद्यालय फार्मसी हॉल येथे आयोजित करण्यात आली असल्याचे भोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाकडून सतत झालेले दुर्लक्ष, विधानसभा अध्यक्ष, राज्य मंत्रिमंडळात वेळोवेळी डावलले गेले आणि विधानसभेत झालेला पराभव, राजगड सहकारी साखर कारखान्याला मिळत नसलेले कर्ज, यामुळे माजी आमदार संग्राम थोपटे हे मेळावे घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून काही दिवसांतच भाजपात प्रवेश करीत असल्याची चर्चा भोर विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. यामुळे भोरमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार आहे? राज्याच्या आणि पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून, भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला.
संग्राम थोपटे अध्यक्ष असलेला राजगड सहकारी साखर कारखाना हा अडचणीत असून, या कारखान्याला राज्य सरकारने ८० कोटींचे कर्ज मंजूर केले होते; पण लोकसभेला संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर अजित पवारांच्या विरोधाने त्यांच्या कारखान्याला मंजूर केलेले कर्ज नाकारण्यात आले. कारखान्याला मदत मिळावी यासाठी संग्राम थोपटे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.